सांगली : मराठा समाजाला अन्य कोणत्याही समाजातून आरक्षण दिले जाणार नसून त्यांना स्वतंत्र आरक्षण दिले जाईल. विनाकारण समाजा-समाजांत कुणी गैरसमज पसरवू नयेत, असा टोला सांगलीचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना लगावला.सांगलीत अप्पर तहसील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते सांगलीत आले होते. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी मागणी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती. त्यावर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आम्ही देणार आहोत. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही अन्य समाजाच्या कोट्यातून त्यांना आरक्षण दिले जाणार नाही. तसा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चासुद्धा झालेली नाही. त्यामुळे विनाकारण असे वाद निर्माण करून गैरसमज कुणी पसरवू नयेत.