कडेगाव : मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे थांबलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी कडेगाव तालुक्यातील गावोगावी ग्रामस्थांतून होत होती. यावर मार्ग काढण्यासाठी आता राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ऑनलाइन किंवा ऑफलाइन ग्रामसभा घेण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. मात्र, ऑफलाइन ग्रामसभा घेण्यास बहुतांश ग्रामपंचायतींकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होण्याची शक्यता असल्याने ऑनलाइनच ग्रामसभा घ्यावी, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
कडेगाव तालुक्यात ५५ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे आता २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी ग्रामसभा ऑफलाइनच घ्याव्यात, अशी अपेक्षा बहुतांश सर्व गावांमधील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना शासनाने स्थगिती दिली होती.
मात्र, ग्रामीण भागातील ग्रामस्थांची व प्रशासनाची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामसभेचे अधिकार देण्यात आले होते. याशिवाय ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचा ऐच्छिक पर्याय दिला होता. मात्र, अपवाद वगळता कोणत्याही गावात ऑनलाइन ग्रामसभा झाली नाही.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे गुरुवार, दि. २३ सप्टेंबर रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने पत्र काढून २ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन किंवा ऑफलाइन ग्रामसभा घ्याव्या, अशा सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेचे नियंत्रण असेल तर कामे नीट होतात. सद्य:स्थितीत अनेक ग्रामपंचायतींमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र आहे.
वास्तविक वर्षभरात एकूण सहा ग्रामसभा होतात. यातील पहिली ग्रामसभा एप्रिल, मेमध्ये होते. दुसरी ग्रामसभा १५ ऑगस्टला होते. तिसरी ग्रामसभा २ ऑक्टोबर आणि चौथी ग्रामसभा २६ जानेवारीला होते. उर्वरित दोन ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार घेतल्या जातात. दोन ग्रामसभांमध्ये तीन महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये याची दक्षता घ्यावी लागते. चालू वित्तीय वर्षात मात्र ग्रामसभाच झालेल्या नाहीत. याचा विकासकामांवर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी ऑनलाइन नको ऑफलाइन ग्रामसभा घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.