सांगली - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्याचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर, एका महिला पत्रकाराशी बोलताना आधी कपाळाला कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो, असे विधान केले. त्यामुळे, संभाजी भिडे चांगलेच चर्चेत आले होते. सोशल मीडियावर अनेकांना त्यांना ट्रोलही केले. आता, सांगलीतील रॅलीवरुन ते पुन्हा माध्यमांत आहेत. शिवप्रतिष्ठानच्या वतीने आज (शुक्रवार) सांगली शहरात काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीस सांगली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर, संभाजी भिडेंनी पोलिसांना निवेदन देत टिपू सुलतानची जंयती साजरी न करण्याची मागणी केली आहे.
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली आजची रॅली निघणार होती. तूर्तास या रॅलीस पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र, मोजक्याचं कार्यकर्त्यासह मोटारसायकली घेऊन जात सिग्नल तोडून ते मोटरसायवर पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना भिडे यांनी पत्रकारांना मज्जाव केला होता. तसेच पत्रकारांना प्रतिक्रिया देण्यासही त्यांनी नकार दिला.
संभाजी भिडे यांनी जिल्हा प्रशासनाला 13 तारखेपर्यंतचा अल्टिमेट दिला आहे. टिपू सुलतान यांची जयंती कोणत्याही परिस्थितीत साजरी केली जाऊ नये. याबाबत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने टिपू सुलतान यांची जयंती करणाऱ्यांना परवानगी देऊ नये. जर जिल्हा प्रशासनाने जयंतीवर बंदी घातली नाही तर सांगली जिल्ह्यात टिपू सुलतानची जयंती होऊ दिली जाणार नाही, असा इशाराच भिडे यांनी यावेळी दिला आहे. निवेदन किंवा मागण्यांबाबत भिडे यांनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले.