संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना लाटेत शाळा बंद पडल्यानंतर गुरुजींची अशैक्षणिक कामे भलतीच वाढली. शासनाने शिक्षकांना जणू हरकाम्याच केले. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले तरी शिक्षकांची अन्य कामे मात्र थांबली नाहीत. आता नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले, तरी ती थांबण्याची चिन्हे नाहीत.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडणाऱ्या एकापेक्षा एक भन्नाट आयडियाच्या कल्पना शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मूळ उद्देशच बाजूला पडू लागला आहे. पोषण आहार तपासणीपासून कोरोनाचे रुग्ण शोधण्यापर्यंत हरेक कामांसाठी गुरुजी रिकामे असल्याचा साक्षात्कार शासनाला होत आहे. काही वर्षांपूर्वी तर चक्क शौचालयांचे सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेवर शिक्षकांना धाडले होते. कोरोनामध्ये अध्यापन पूर्णत: थांबले असून गुरुजी जणू साथरोग प्रतिबंधक अधिकारी बनले आहेत.
बॉक्स
एक शिक्षकी शाळांत हाल
एक शिक्षकी शाळांत तर शिक्षकांच्या हालांना पारावार राहत नाही. विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम तर करावे लागतेच, शिवाय तालुक्याच्या व केंद्रशाळांच्या बैठका, वाडी-वस्तीतील सर्वेक्षणे, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेसाठी लोकवर्गणीचे संकलन अशा प्रत्येक आघाडीवर हा एकांडा शिलेदार लढत राहतो.
बॉक्स
शिक्षकाची कामे
- खिचडी शिजवून घेऊन मुलांना वाटप करणे
- सध्या शाळा बंद असल्याने धान्य वाटप
- निवडणूक ओळखपत्र वाटप, जनगणना, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण
- मतदार नोंदणी व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया
- शाळेची देखभाल दुरुस्ती, लोकवर्गणी संकलन
- कोरोना चेकपोस्टवर बंदोबस्त
- कोरोना लसीकरणामध्ये आरोग्य विभागाला सहकार्य
- घरोघरी कोरोना संशयितांचे सर्वेक्षण
बॉक्स
एक शिक्षक खास राखीव
- प्रत्येक शाळेतील एखादा हरहुन्नरी शिक्षक या अशैक्षणिक कामांसाठीच राखीव ठेवला जातो. वरुन परिपत्रक येताच त्याला कामाला लावले जाते.
- शिष्यवृत्तीचे फॉर्म भरुन घेणे, विद्यार्थ्याची बँक पासबुके, दाखले गोळा करणे अशी कारकुनी कामे त्याच्यावर सोपवली जातात.
- सहकारी शिक्षकांनी केलेल्या कामांच्या नोंदी करणे, पोषण आहाराचे दप्तर अपडेट ठेवणे यासाठी हा शिक्षक कायमस्वरुपी आरक्षित असतो.
बॉक्स
वर्ग दुसऱ्याकडेच
अध्यापन सोडून राहिलेली सर्व कामे करणाऱ्या शिक्षकाचा वर्ग वाऱ्यावरच राहतो. अन्य शिक्षक त्याच्या वर्गावर जाऊन उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न करतात. आता तर कोरोना काळात शाळा बंद असल्याने अशा कामसू शिक्षकांवर शासनाची जास्तच मर्जी बसली आहे. कोरोना चेकपोस्टवर रात्रपाळ्या करणारे शिक्षक परराज्यातील व परजिल्ह्यातील प्रवाशांवर लक्ष ठेवून आहेत. जत तालुक्यात एका चेकपोस्टवर शिक्षकाचा बळी गेल्यानंतरही ड्यूटी मागे घेतली गेली नाही.
पॉईंटर्स
जिल्हा परिषदेच्या शाळा - १,६८८
एकूण शिक्षक संख्या - ५, ८८९
शिक्षक संघटना म्हणतात...
शिक्षकी पेशाच्या मूळ आत्म्यालाचा शासनाने हात घातला आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष शिक्षण बाजूला ठेवून अन्य सामाजिक कामांसाठीच शिक्षकांना जुंपले जात आहे. राष्ट्रीय कर्तव्य, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कामे अशा कारणास्तव कामांना नकारही देता येत नाही.
- हरिभाऊ गावडे, शिक्षक समिती
धान्य वाटपाचे काम करतानाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचीही काळजी घ्यायची अशी दुहेरी कसरत सध्या सुरु आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. कोरोना काळात शिक्षकांना अन्य कामे समजण्यासारखी आहेत, पण इतरवेळी मात्र या कामांचा शासनाने फेरविचार करायला हवा.
- सुरेश नाईक, शिक्षक समिती.