सांगली : कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही ठोस औषध तयार झालेले नाही. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय असल्याचे समोर आले आहे. आयुर्वेदिक काढ्यांचे सेवन नागरिक करू लागल्याने औषधी वनस्पतींचे महत्त्वही वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत हजारो नागरिकांनी नर्सरी विक्रेत्यांकडे याविषयी विचारणा करून त्यांच्याकडून औषधी वनस्पतींच्या बिया व रोपांची मागणी वाढली आहे. तुळस, अश्वगंधा, गुळवेल, पानवेल, गोकर्ण वेल, अडुळसांच्या रोपांना सर्वाधिक मागणी असल्याचे नर्सरी चालकांनी सांगितले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधी काढ्याचा उपयोग घरोघरी केला जात आहे. त्यामुळे घरच्या गच्चीतील बागेत गवती चहा, कृष्णतुळस, गुळवेल, पानवेल या औषधी वनस्पतींचा बहर आला आहे. विविध रोपवाटिकांमध्ये सध्या फूलझाडांऐवजी औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचे नर्सरी चालकांचे म्हणणे आहे.
मागणी असलेल्या रोपांमध्ये गवती चहा, कृष्णकापूर तुळस, ओवा, गुळवेल, पानवेल, गोकर्ण वेल, अडुळसा, अश्वगंधा, गुडूची यांचा समावेश असून या रोपांना घराच्या बाल्कनीत, गच्चीत, सोसायटीच्या आवारात बहर आला आहे. गुगलवरही या औषधी वनस्पतींची, त्यासंबंधी नर्सरीची आणि लागवडीची माहिती नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सर्च करून या वृक्षांची लागवड केली आहे. घरी, सोसायटीत तयार होणाऱ्या सेंद्रीय खतांच्या सहाय्याने ही रोपे वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे त्यातील औषधी गुण टिकून राहात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गुळवेल, तमालपत्र, कोरफड, काळी तुळस, राम तुळस, काळी हळद, आंबे हळद, हळदीची पाने यांची मागणी वाढली आहे. या दोन महिन्यांत निश्चितच दुपटीने मागणी वाढली आहे परंतु लॉकडाऊन आणि काही नियमांमुळे सर्वांपर्यंत पोहोचणे आम्हालाही शक्य होत नाही आहे. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी पंधरा ते वीस हजारांचा व्यवसाय नर्सरीतून होत होता. तोच आता चाळीसच्या आसपास गेला आहे, अशी माहिती नर्सरीचालक सागर मोटे यांनी दिली.तुळस या औषधी वनस्पतीला बाराही महिने मागणी असते. गेल्या दोन महिन्यांत विक्स तुळसला मागणी वाढली आहे. लॉकडाऊनपूर्वी महिन्याकाठी पंधरा ते वीस ग्राहक याची खरेदी करत असत. ही संख्या आता दुप्पट झाले आहे. औषधी वनस्पतींच्या विक्रीमुळे व्यवसायही वाढला आहे, असे नर्सरीचालक सुनील सावंत यांनी सांगितले.या पाच रोपांना वाढली मागणी
- तुळस : कृष्ण तुळस, काळी तुळस, विक्स तुळस, लक्ष्मी तुळस, लवंगी तुळस असे तुळीशीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक तुळशीचा गुणधर्म वेगळा आहे. जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके तुळशीत आहेत. त्याचे तेल एक जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते. त्यामुळे त्याचा वापर विविध आजारांवरही केला जातो. भारतात यास एक घरगुती औषधांचा भांडार मानले जाते.
- अश्वगंधा : अश्वगंधेचे अनेक फायदे आणि वापर आहेत, पण तिचे प्रमुख वापर तणावरोधी उपचारांमध्ये होते. अँटिऑक्सिडंट्स, अँटि इन्फ्लेमेटरी, अँटिस्ट्रेस आणि अँटिबॅक्टेरियल गुण अधिक प्रमाणात आहेत. जे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती जास्त चांगली करण्यासाठी आणि झोप अधिक चांगली येण्यासाठी मदत करतात.
- गुळवेल : मधुमेह असलेल्या मधुमेहाच्या रुग्णांना गुळवेलच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात फायदा होतो. गुळवेल मलेरिया, टायफाईड अशा रोगांवर उपचार करण्यासाठी हे वापरण्यात येतं. गुळवेलच्या सेवनामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात. गुळवेलच्या सेवनामुळे अपचन होत नाही आणि पोटदुखीही कमी होते.
- पुदिना : आयुर्वेदानुसार पुदिना हा पाचक, रूचकर, स्वादप्रिय, हृदय, उष्णवात व कफ दोषहारक व कृमीनाशक आहे तसेच पुदिन्यामध्ये कॅल्शिअम लोह, फॉस्फरस क, ड व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
- अडुळसा : कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा या वनस्पतीचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.