विटा : भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त ७ ते ९ एप्रिल या कालावधीत ‘रुस्तम-ए-हिंद’ या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या क्रमांकासाठी महिंद्रा थार गाडी बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले, बैलगाडी शर्यती शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे मी कुस्ती आखाड्यातून थेट बैलगाडी शर्यतींच्या आखाड्यात आलो आहे. याचा अर्थ, मी कुस्ती आखाडा बंद करणार नाही, पण बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून गोवंश वाढीचा प्रयत्न करीत आहे. युथ फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाळवणी येथे देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी स्पर्धा घेत आहेत.या स्पर्धेसाठी नोंद झालेल्या एका बैलगाडीच्या पाठीमागे सहा जणांनी रक्तदान करण्याची अट घालण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकासाठी महिंद्रा थार गाडी देण्यात येणार असून, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर देण्यात येणार आहे. चौथे, पाचवे व सहावे बक्षीस दुचाकीचे आहे.उपांत्य फेरीतून दुसऱ्या क्रमांवर येणाऱ्या गाड्यांचा दुसरा अंतिम राऊंड घेण्यात येणार असून, त्यातील पहिल्या विजेत्यासही दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या क्रमांकापासून सहाव्या क्रमांकापर्यंतच्या बैलगाड्यांना रोख बक्षीस देणार आहे. या स्पर्धेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, मोठी स्क्रीनही ठेवण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
वा रे पठ्ठ्या! बैलगाडी शर्यतीसाठी महिंद्रा थार, ट्रॅक्टरची बक्षिसे; सांगलीत एप्रिलमध्ये रंगणार थरार
By श्रीनिवास नागे | Published: March 22, 2023 3:34 PM