मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ताकारी-शेणोलीदरम्यान १६ किमी दुहेरी रेल्वेमार्गाची चाचणी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांच्या उपस्थितीत पार पडली. निरीक्षण व्हॅन व चाचणी एक्स्प्रेस या मार्गावरून १३० किमी गतीने धावल्याने दुहेरी मार्गाची चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी जाहीर केले. मिरज-पुणे या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे गतवर्षी काम सुरू झाले असून, ताकारी-शेणोलीदरम्यान १६ किलोमीटर नवीन मार्गावरुन आता मालवाहतूक सुरू होणार आहे.
मिरज-पुणे या २८० किमी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असून, ताकारी ते शेणोलीदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असल्याने बुधवारी सकाळी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नवीन रेल्वे मार्गाची चाचणी घेतली. ताकारी रेल्वे स्थानकात तपासणीनंतर ट्रॉली व्हॅनमधून ताकारी-शेणोली नवीन दुहेरी रेल्वेमार्गावर ताशी १३० किमी गतीने नवीन रेल्वेमार्गावर रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांच्यासह अधिकाऱ्यांनी ट्रॉली व्हॅनमध्ये बसून चाचणी घेतली. त्यानंतर दुपारी ९ बोगीची चाचणी एक्स्प्रेसने या मार्गावरून १३० किमी गतीने सुपरफास्ट धावून दहा मिनिटात हे अंतर पूर्ण केले. तांत्रिकदृष्ट्या नवीन मार्ग प्रवासी वाहतुकीस सुरक्षित असल्याचे तपासणीत आढळले. याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविणार असून, पुढील महिन्यापासून या मार्गावरुन मालगाडी धावणार आहे.
यावेळी शेणोली स्थानकाची पाहणी केली. पुणे-फुरसुंगी या १९ किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, या मार्गासह पुढील टप्प्यात ताकारी ते भिलवडी या २० किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण करून या वर्षाअखेर चाचणी होणार आहे. दुहेरी रेल्वेमार्गाच्या चाचणीस मध्य रेल्वे, पुणे मंडल रेल प्रबंधक मिलिंद देऊसकर, मध्यरेल्वेचे मुख्य अभियंता आर. के. मिश्रा यासह अधिकारी उपस्थित होते.‘लोंढा-मिरज’ वर्षभरात पूर्णरेल्वे मंत्रालयाने २०१५ मध्ये दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी अर्थिक तरतूद केल्याने लोंढा-मिरज-पुणे या ४६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू असून, मार्गावर नवीन पुलांच्या उभारणीसह दुहेरीकरणासाठी मातीच्या भरावाचे काम पूर्ण झाल्याने लोंढा-मिरज या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.केवळ चार तासात पुण्यातमिरज-पुणे या मार्गाच्या दुहेरीकरणाची अनेक वर्षांची मागणी आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरजेतून केवळ चार तासात पुण्यात पोहोचता येणार आहे. मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरजेतून पुणे, मुंबई प्रवास जलद व सोयीचा होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे व मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी असून, मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.मिरज-पुणे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ताकारी-शेणोलीदरम्यान १६ किमी दुहेरी रेल्वेमार्गाची ट्रॉली व्हॅनमधून चाचणी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांच्या उपस्थितीत पार पडली.