अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघातील आजवरच्या निवडणुकांचा इतिहास आहे. आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकास-एक उमेदवार देण्याचा फंडा विरोधकांना कधीच जुळला नाही. आगामी विधानसभेलाही तिरंगी लढतीचे डावपेच पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्याकडून टाकले जातील. त्यासाठी विरोधी गटातील कोणते नेते ‘बी टीम’ म्हणून कार्यरत होतील, याविषयी महायुतीमध्ये संशयकल्लोळ असतो.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या यशाचे श्रेय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जाते. त्यामुळे आगामी विधानसभेला जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची खलबते सुरू आहेत. त्यासाठीच मतदारसंघात एकास-एक लढत करण्यासाठी विरोधी गटातील उमेदवारीवर खलबते सुरू आहेत. भाजपा की शिवसेनेचा उमेदवार याचा चेंडू मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी यापूर्वीच उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. यांच्याबरोबर भाजपमधून राहुल महाडिक, विक्रम पाटील आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांनीही दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानून हुतात्मा संकुलातील गौरव नायकवडी आणि जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार हेही आपण विधानसभेच्या तयारीत असल्याचे सांगतात. महायुतीमधील अंतर्गत कलहामुळे मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात असलेल्या काही गटांची बेकी होण्याची चर्चा रंगली आहे.
महायुतीत उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. भाजपला मतदारसंघ सुटल्यास ज्येष्ठता व निष्ठेचा विचार करता उमेदवारीवर माझाच हक्क आहे. जयंत पाटील यांच्यासाठी विरोधी गटात ‘बी’ टीम कार्यरत असल्याची चर्चा निराधार आहे. - विक्रम पाटील, माजी नगरसेवक, भाजप
महायुतीतील घटक पक्षातील पदाधिका-यांमध्ये गटबाजी व हेवेदावे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण आले असावे. मात्र त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. अशा ‘बी टीम’ची आम्हाला गरजही नाही. - देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष