सांगली : शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह आता राजकीय क्षेत्रालाही कोरोनाचा दंश झाला आहे. जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय सक्रिय कार्यकर्ते कोरोना संसर्गाबाबत अधिक काळजी घेऊ लागले आहेत.
आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील हेसुद्धा बाधित झाले आहेत.
मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे हे कोरोनामुक्त झाले असून आणखी काही दिवस त्यांना घरातच विलगीकरण करून घ्यावे लागणार आहे. काही राजकीय नेत्यांसह त्यांचे कुटुंबीय, वाहनचालक, कार्यकर्ते यांनाही संसर्ग झाला आहे.