लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : येथील वाॅन्लेस रुग्णालयातील डाॅ. एरिक जाॅन डेव्हिड (वय ६४) यांचे अल्प आजाराने निधन झाले. वॉन्लेसच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख म्हणून ते काम करत होते. दोन महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एक अत्यंत जाणकार फुप्फुसरोग विशेषज्ञ अशी त्यांची ओळख होती. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर वॉन्लेसमध्येच ते रुजू झाले. ३५ वर्षांच्या वैद्यकीय सेवेत हजारो दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना त्यांनी बरे केले. फुप्फुसरोग विषयात त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. संपूर्ण देशभरातून उपचारासाठी त्यांच्याकडे रुग्ण यायचे. पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कामही त्यांनी केले. वॉन्लेसमध्ये पल्मनरी मेडिसीन केअर युनिट त्यांच्या पुढाकारानेच सुरू झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. जेकी, मुलगा डॉ. शिमॉन आणि मुलगी डॉ. नताशा असा परिवार आहे. डॉ. डेव्हिड यांचे पार्थिव रविवारी संध्याकाळपर्यंत मुंबईतच होते. मिरज आयएमएतर्फे आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.