सदानंद औंधे
मिरज : महापालिकेच्या शाळांची मोठी दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. मात्र मिरजेत महापालिकेच्या मिरज हायस्कूलमध्ये शिकलेल्या व कॅनडामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डाॅ. विलास प्रभू वय ७२ या विद्यार्थ्याने शाळेबद्दल कृतज्ञता म्हणून शाळा नूतनीकरणासाठी तब्बल ८० लाख रुपये दिले आहेत. डाॅ. प्रभू यांच्या देणगीतून रुपडे पालटलेल्या शाळा इमारतीचे महापाैर व आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
गरीब विद्यार्थांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या शाळा इमारतींची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली आहे. गळके छत, दरवाजे खिडक्यांची मोडतोड, फरशा उचकटलेल्या अशी अनेक शाळांची अवस्था दिसून येते. मिरजेत मिरज हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी डाॅ. प्रभू यांनी आपण शिकलेल्या शाळेच्या इमारतीची दुरावस्था पाहून शाळा इमारतीच्या नूतनीकरणासाठी दोन वर्षापूर्वी मदतीचा हात पुढे केला.
डाॅ. विलास प्रभू व १९६१ ते १९६५ दरम्यान मिरज हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत शिकले. त्यांची पाच भावंडेही याच शाळेत शिकली. सर्व सहा भावंडांनी वैद्यकीय पदवी मिळविली. डाॅ. प्रभू यांनी कान-नाक-घसा सर्जन म्हणून इंग्लंडमध्ये काही वर्षे व त्यानंतर ३० वर्षे कॅनडामध्ये वैद्यकीय व्यवसाय केला. वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले आहेत.
आपण शिकलेल्या शाळेबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी शाळा इमारतीचे नूतनीकरण व विद्यार्थांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शाळेस पत्र्याचे नवीन छत दीड हजार चाैरस फूट हाॅल सहा वर्गात ई-लर्निग सुविधा शाळेत शाैचालये, स्वच्छतागृहे स्त्री पुरुष शिक्षकांसाठी स्वतंत्र स्टाफरुम, विद्यार्थांसाठी नवीन बेचेस, शुद्ध पाणीपुरवठा यंत्रणा, तज्ज्ञांमार्फत शिक्षकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण व विद्यार्थांना काैशल्य विकास प्रशिक्षण, वैज्ञानिक मार्गदर्शनासाठी डाॅ. विलास प्रभू यांनी तब्बल ८० लाख रुपये खर्च केले आहेत. डाॅ. प्रभू यांनी शाळेचे रुपडे पालटले आहे. गेली दोन वर्षे सुरू असलेल्या हे काम पूर्ण झाल्यानंतर डाॅ. प्रभू यांनी कॅनडातून मिरजेत येऊन या कामाचे लोकार्पण केले.
यावेळी महापाैर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडनीस, मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.