लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यात द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे सुरू आहेत. यावर्षी परतीचा मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली होती. पाणी उपलब्ध असल्याने खरड छाटणी वेळेवर होणार आहे. काड्या चांगल्या तयार होणार असल्यामुळे द्राक्ष उत्पादनात वाढ होणार आहे.
तालुक्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बागा आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करीत उजाड अशा फोंड्या माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले जात आहे.
पूर्व भागातील उमदी, सुसलाद, सोनलगी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द परिसरातील दर्जेदार हिरव्या, पिवळ्या, सुट्या खाण बेदाण्यांची निर्मिती केली जाते. बिळूर, डफळापूर, तिकोंडी, भिवर्गी परिसरात मार्केटिंग माल तयार केला जातो.
व्यापारी ऐन हंगामाच्यावेळी द्राक्षांचा दर पाडत आहेत. बागेतील चांगला माल उचलला जातो. बाकीचा माल काय करायचा, हा प्रश्न निर्माण होतो. कमी प्रतीच्या मालाचा नाइलाजाने बेदाणा करावा लागतो. बाजारात बेदाण्याला बऱ्यापैकी दर मिळतो. त्यामुळे बेदाणा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
बागांची खरड छाटणी घेऊन मे महिन्यात काडी तयार करावी लागते. काडी शक्तिशाली होण्यासाठी उन्हाची गरज असते. बागायतदार एप्रिल-मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरड छाटणी करतो. बाग लवकर फुटण्यासाठी डाॅरमिक्स लावले जाते. रासायनिक व सेंद्रिय खत टाकून बोध बांधले जात आहेत. कडक उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून उसाचा पाला झाडाच्या बुंद्यात टाकला जात आहे.
खरड छाटणीनंतर बागेस पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर काडी अपरिपक्व तयार होणे तसेच त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. मात्र, यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे.
चौकट
मजुरांना रोजगार उपलब्ध
द्राक्षबागेसाठी छाटणी करणे, खुडा काढणे, पेस्ट लावणे, डाॅरमिक्स लावणे, बेदाणा शेडला टाकणे, बेदाणा झाडणे, शेंडा खुडणे, वांझ काढणे व इतर कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. मजुरांना तीन रोजगाराची संधी मिळते. पुरुषाला ३५० रुपये, महिलेला ३०० रुपये मजुरी मिळत आहे.