सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सहाजणांचा तसेच संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाट्यगीतांचा कार्यक्रम, नाटक असे कार्यक्रमही होणार आहेत, अशी माहिती परिषदेच्या सांगली शाखेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले की, गतवर्षापासून विविध व्यक्ती व संस्थांना रंगभूमी दिनानिमित्ताने गौरव करण्यास सुरुवात करण्यात आली. यंदा ‘काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव’ पुरस्काराने नाट्यक्षेत्राला वाहून घेतलेले डॉ. मधुकर आपटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘आचार्य अत्रे प्रतिभारंग सन्मान’ ज्येष्ठ लेखक श्रीरंग विष्णू जोशी यांना, ‘अरुण पाटील नाट्यतंत्र सन्मान’ आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक व नाट्य दिग्दर्शक प्रकाश गडदे यांना, ‘दिलीप परदेशी नाट्यरंग सन्मान’ नाट्यलेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजेंद्र पोळ यांना देण्यात येणार आहे.
संगीताची जोपासना करणारे जे थोडे जाणकार होते, त्यामध्ये सांगलीचे नाना ताडे यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. उत्तम हार्मोनियम आणि आॅर्गनवादक म्हणून ते सांगलीकरांना परिचित होते. नाना ताडे यांच्या नावाने यंदा प्रथमच पुरस्कार देण्यात येणार असून, तो यावेळी देवल स्मारक मंदिरास देण्याचा निर्णय झाला आहे. नुकतेच या संस्थेने थिएटर आॅलिम्पिक्समध्ये संगीत शारदा हे नाटक दिल्ली येथे सादर केले होते. नाट्यक्षेत्रातही संस्थेचे महत्त्वाचे योगदान आहे. सांगली जिल्हा नगरवाचनालयास दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या संस्थेचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
रंगभूमीदिनाच्या पूर्वसंध्येला भावे नाट्यमंदिर येथे ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, भावे गौरव पदकाचे मानकरी डॉ. मोहन आगाशे, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता गौरव सोहळा आयोजित केला आहे. तत्पूर्वी दुपारी ४ वाजता कोल्हापूर येथील गुणीदास फाऊंडेशन संस्थेतर्फे स्मृतिगंध हा भाव, भक्ती व नाट्यगीतांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सायली तळवलकर आणि महेश हिरेमठ सहभागी होणार आहेत. रात्री ९ वाजता ‘जरा समजून घ्या’ हे डॉ. मोहन आगाशे यांचे नाटक सादर होणार असल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली. यावेळी पटवर्धन यांच्यासोबत भालचंद्र चितळे, सनीत कुलकर्णी, धनंजय गाडगीळ, शशांक लिमये, हरिहर म्हैसकर, प्रसाद बर्वे आदी उपस्थित होते.