सांगली : सर्व श्रमिक संघासह विविध कामगार संघटनांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. वाढीव निवृत्तीवेतनासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन झाले.संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ पाटील यांच्यासह महादेव देशिंगे, रमजान मुलाणी, दीपक कांबळे आदींनी नेतृत्व केले. तत्पूर्वी स्वातंत्र्यदिनी आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यात म्हंटले आहे की, इपीएस पेन्शन योजनेतील बदलामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अच्छे दिनाची घोषणा करताना निवृत्तीवेतनधारकांना बुरे दिन दाखवले. इपीएस पेन्शनर समन्वय समितीतर्फे याचा निषेध करत आहोत.आंदोलकांच्या मागण्या अशा : इपीएस निवृत्तीवेतनधारकांना ९००० रुपये निवृत्तीवेतन व महागाई भत्ता मिळावा. प्रवासात सवलत, मोफत रेशन व मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत. पेन्शनवाढीमधील अडचणी दूर करा. निवृत्तीवेतन निधीचे खासगीकरण करु नका. भविष्य निर्वाह निधी कार्यालयात पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करा.आंदोलनात तुकाराम पाटील, सदाशिव शिंदे, अनिल सावंत, बापू शेटे, रावसाहेब यादव, अशोक कदम, सदाशिव सगरे, यांनीही भाग घेतला.
अच्छे दिनाची स्वप्ने दाखवत बुरे दिन वाढून ठेवले, निवृत्तीवेतनधारकांचा आरोप; सांगलीत लाक्षणिक उपोषण
By संतोष भिसे | Published: August 17, 2023 2:32 PM