सांगली : एकेकाळी नावलौकिक असलेल्या सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात सेवासुविधांचा बोजवारा उडाला आहे. कॅन्टीनमध्ये मद्यप्राशन व अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. याशिवाय महाविद्यालय परिसर गुन्हेगारी विळख्यात सापडला आहे. तातडीने सेवासुविधा पुरवून गुन्हेगारी मोडीत काढावी, अन्यथा संस्थेविरुद्ध आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे.परिषदेच्या वतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरामध्ये विलिंग्डन महाविद्यालय परिसरात अनेक गुन्हेगारी घटना घडलेल्या आहेत. दोन गटांमध्ये हाणामारी, शिक्षकांवर जीवघेणे हल्ले असे प्रकार महाविद्यालयात घडलेले आहेत. संस्थेच्या दोन्ही कॅन्टीनमध्ये मद्यपान करणे, धूम्रपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार घडत आहेत. हे कॅन्टीन म्हणजे दारूचा अड्डा झाला आहे.काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयात एका शिक्षकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. तर एका शिक्षकाची गाडी पार्किंग मध्ये उभी असताना अज्ञात गुंडांनी तोडफोड करण्याचा धक्कादायक प्रकारही घडलेला आहे.महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्यांचा धाक नसल्यामुळे याठिकाणी गुन्हेगारी व अवैध प्रकार सुरू आहेत. त्यामुळे त्यांची बदली करावी व सक्षम प्राचार्य नेमावेत. संस्थेने महाविद्यालयासह वसतिगृहात सर्व सुविधा द्याव्यात. संस्थेने याबाबत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना विभाग संयोजक माधुरी लड्डा, जिल्हा संयोजक दर्शन मुंदडा, महानगरमंत्री उत्तरा पुजारी, सहमंत्री सूरज मालगावे आदी उपस्थित होते.
संस्थेकडे केलेल्या मागण्या
- महाविद्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत.
- प्रभावी सुरक्षारक्षकांची नेमणूक करून गुन्हेगारीला आळा घालावा
- संस्थेच्या आवारात असलेले दोन्ही कॅन्टीन भाडेतत्त्वावर द्यावेत.
- कॅन्टीनमधील गैरप्रकार थांबवावेत
- प्राचार्यांची अन्य ठिकाणी बदली करावी व कार्यक्षम प्राचार्यांची नियुक्ती करावी.
- महाविद्यालयाची, स्वच्छतागृहांची वेळच्या वेळी स्वच्छता करण्यात यावी.