सांगली : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व शाळांमधील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या सोमवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. यावेळी शिक्षकांचे शाळेतील वेळापत्रक बदलून साडेनऊ ते साडेपाच असे करण्याचा ठराव करण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची सभा पार पडली. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सेवा-सुविधांचा विषय चर्चेला आला. मुलांना दिले जाणारे पिण्याचे पाणी नियमितपणे तपासले जाणे गरजेचे आहे, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले. त्यानुसार सभापतींनी सर्वच शाळांमधील पिण्याच्या पाण्याची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल समितीपुढे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्याचबरोबर शालेय पोषण आहाराचा पुरवठा करताना आवश्यक स्वच्छता राखण्याबाबत आदेश देण्यात आले. तांबवे (ता. वाळवा) येथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्काऊट गाईडचा मेळावा घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शिक्षकांचे वेळापत्रक बदलण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. सभेतही वेळापत्रक बदलाची चर्चा झाली. शिक्षकांना अध्यापनाबरोबरच वाचन व चिंतनासाठी वेळ मिळावा म्हणून वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास शिक्षकांनी उपस्थित राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे वेळापत्रक आता साडेनऊ ते साडेपाच असे करण्यात आले. जिल्ह्यातील शाळांच्या इमारती व जागांची मालकी नोंद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे करण्याचा विषय गत सभेत चर्चेला आला होता. त्यावेळी शाळांच्या मालकी नोंदीविषयी आदेश देण्यात आले होते. त्याचा आढावा सभेत घेण्यात आला. एकूण १७०० शाळांपैकी ९७३ शाळांच्या मालकी हक्काच्या आॅनलाईन नोंदी करण्यात आल्या असून, उर्वरित शाळांच्या मालकी नोंदीही लवकरात लवकर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे करण्याचे आदेश देण्यात आले. काही शाळा खोल्यांचे निर्लेखन केल्यानंतर त्याचे पैसे जिल्हा परिषदेकडे भरले नसल्याची माहिती सभेत देण्यात आली. सभापतींनी संबंधित पैसे ग्रामपंचायतींनी तातडीने जिल्हा परिषदेकडे भरावेत, अशा सूचना दिल्या. (प्रतिनिधी)
सर्व शाळांमधील पिण्याच्या पाण्याची तपासणी होणार
By admin | Published: November 30, 2015 11:08 PM