घाटनांद्रे : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ) येथे मंजूर असलेले एक कोटी ७० लाख रुपये संभाव्य खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सध्या युद्धपातळीने सुरू झाले आहे. या योजनेनुसार गावातून पाइपलाइन बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार संजयकाका पाटील यांनी माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या सहकार्याने घाटनांद्रेसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी एक कोटी ७० लाख रुपये खर्चाची योजना मंजूर करून घेतली होती.
या योजनेंतर्गत रायवाडी तलावाच्या पात्राशेजारी विहीर खोदली जाणार असून, त्यालगतच जॅकवेल व पंपहाउस बसविण्यात येणार आहे. तेथून साधारणपणे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर बंदिस्त पाइपलाइनद्वारे घाटनांद्रे गावात पाणी आणून फिल्टर करून टाकीत टाकून ते गावांतर्गत पाइपलाइनद्वारे घरोघरी शुद्ध व मुबलक पाणी दिले जाणार आहे.
त्यासाठी गावात नवीन पाण्याची टाकी फिल्टर हाउससह उभारली जाणार आहे.