गोटखिंडी : शेतीला पाणी कमी पडू लागले आहे. भविष्यात उपलब्ध पाण्यावर शेतकरी अवलंबून असल्याने, राज्यात ठिबक प्रणाली राबविणे गरजेचे बनले असल्याचे मत कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. गोटखिंडी (ता. वाळवा) येथील शिवम, शिवराज चंद्रकांत थोरात, साहिल येवले यांची भूतान येथे होणाऱ्या ‘जंप रोप’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्यावतीने सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी येथील सर्जेराव थोरात हे सतत आमच्या पाठीवरुन मायेचा हात फिरवित होते. सहकारी संस्था ठिबक प्रणाली प्रभावीपणे राबविल्याचे गोटखिंडी येथील संस्थेने दाखवून दिले आहे. त्याचा आधार घेत राज्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्र सहकारी पाणी पुरवठा संस्था ठिबक सिंचनाखाली आणणार असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भास्कर कदम, हुतात्मा दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. खोत यांच्याहस्ते अशोक पाटील, सायली शेजावळे यांचा सत्कार करण्यात आला. अशोक पाटील, सतीश पाटील, महादेव घारे, दत्ताजीराव थोरात, ए. आर. थोरात, बी. टी. घारे, विजय पाटील, चंद्रकांत थोरात, एस. आर. पाटील, सुनील थोरात, दीपक थोरात उपस्थित होते. (वार्ताहर)
राज्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रावर ठिबक
By admin | Published: March 30, 2017 11:37 PM