प्रमोद रावळ ।आळसंद : महिलांवरील अत्याचार व मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा परिस्थितीत निर्जन रात्री बसथांब्यावर बसमधून एकट्या उतरलेल्या प्रवासी तरुणीचे पालक तिला नेण्यासाठी येईपर्यंत क-हाड आगारातील चालक-वाहक तिचे पाठीराखे बनून राहिले. हा प्रत्यय आंबेगाव (ता. कडेगाव) येथे आला.
दोन दिवसांपूर्वी रात्री साडेदहा वाजता क-हाड आगाराची बस प्रवाशांना घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. बसचे चालक एस. पी. गोतपागर, तर वाहक विवेक गुंडगे होते. बसमध्ये वडियेरायबागला जाण्यासाठी सुप्रिया महादेव कोळेकर ही महाविद्यालयीन तरुणी होती. ही बस रात्री साडेअकरा वाजता कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील भररस्त्यावरील बसथांब्यावर पोहोचली. त्यावेळी रात्री अंधार असल्याने वाहक गुंडगे यांनी सुप्रियाला, गावी कसे जाणार, असे विचारले. गाडीत झोप लागल्यामुळे पालकांना फोन करायला उशीर झाला होता. ते अजून आलेले दिसत नाहीत. त्यांना यायला वेळ लागणार आहे. असे सुप्रियाने सांगितले.
वेळ रात्रीची होती आणि रस्ता निर्जन होता. अशावेळी एकट्या मुलीला सोडून जाणे योग्य नाही, असे चालक-वाहनांना वाटले. त्यांनी तिचे वडील महादेव कोळेकर तिथे येईपर्यंत २० मिनिटे बस आंबेगाव बसथांब्यावरच थांबविली. मोठ्या घाईगडबडीने वडील आले. मुलीला पाहिल्यावर त्यांच्या जिवात जीव आला. काळोखात बसचे चालक व वाहक आपल्या मुलीचे पाठीराखे झाले. त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. रात्री पावणेबारा वाजता सुप्रिया वडियेरायबागला गेल्यानंतर बस पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
प्रवाशांकडून कौतुकरात्रीच्या काळोखात राज्य परिवहन महामंडळाच्या बसची प्रवासी असलेल्या महाविद्यालयीन तरूणीच्या संरक्षणाची जबाबदारी वाहक व चालकांनी घेतली. क-हाड आगाराचे चालक एस. पी. गोतपागर आणि वाहक विवेक गुंडगे यांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याने त्यांचे बसमधील प्रवाशांनी कौतुक केले.