वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे दुचाकी खड्ड्यात पडून एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान अपघातात झाला.अधिक माहिती अशी, टाकवे (ता. शिराळा) येथील पाहुण्यांकडून गणेश दिलीप नलवडे व मित्र रत्नाकर हिंदुराव चव्हाण (रा. सुपने तांबवे) हे दुचाकी (एमएच ११-९७९४) वरून उत्तर तांबवे (सुपने तांबवे, ता. कराड) कडे रात्री ९ ते १० दरम्यान जात होते. वाटेगाव येथे वाकुर्डे बुद्रूक ते कासेगाव या राज्य महामार्गाचे सध्या काम चालू आहे. वाटेगाववाडी विभागातील पेट्रोलपंपानजीक रस्त्याच्या पाइपलाइनसाठी काढलेल्या खड्ड्यात गाडी गेल्याने गणेश दिलीप नलवडे (वय ३५) हा खड्ड्यातील पाण्यात पडून जखमी झाला.त्याला दवाखान्यात नेले असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला रत्नाकर चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे. कासेगाव पोलिस ठाण्यात रोहन संजय मोहिते (रा. टाकवे) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक दीपक जाधव तपास करत आहेत.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करावाकुर्डे ते कासेगाव रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी सेवा रस्ता अर्धवट खोदून ठेवला आहे. याठिकाणी दिशादर्शक नामफलक, बॅरिकेट लावलेली नाहीत. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. हा दुर्दैवी राज्यमार्ग अजून किती बळी घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे. ठेकेदार व महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.