अहिरवाडी (ता. वाळवा) येथे ड्रोनद्वारे मिळकतींची मोजणी करण्याच्या कामाची सुरुवात शशिकांत शिंदे यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी अशोक चव्हाण, दीक्षांत देशपांडे, राहुल कदम, शिवाजी कदम, बळी यादव उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात प्रत्यक्ष ड्रोनद्वारे मोजणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवे तालुक्यातील ४९ गावांच्या गावठाणाची सिटी सर्व्हेला नोंद करण्यासाठी ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या मोजणीचा प्रारंभ अहिरवाडी (ता. वाळवा) येथे करण्यात आला.
या ड्रोन सर्व्हेमुळे प्रत्येक गावातील खासगी मिळकती, शासकीय मिळकती, रस्त्यांची लांबी, नाल्याचे क्षेत्र असा सर्व दस्ताऐवज भूमिअभिलेख विभागाकडून उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे भूमिअभिलेखचे उपअधीक्षक अशोक चव्हाण यांनी सांगितले.
अहिरवाडी येथे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्याहस्ते गावठाण जमाबंदी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कवठेमहांकाळचे उपअधीक्षक विजय शेंडगे, शिराळा येथील नंदकुमार माळवे, सरपंच मंगल कदम यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले, पुणे विभागाचे भूमिलेख उपसंचालक किशोर तवरेज आणि जिल्हा अधीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या सहकार्याने ४९ गावांच्या ड्रोन सर्व्हेचे काम सुुरू आहे. अस्लम मुजावर यांनी योजनेची माहिती दिली. विनायक केंगणे, महादेव ऐवळे, दादासाहेब सिसाळ यांनी ड्रोनचे संचालन केले. शरद पवार यांनी आभार मानले. यावेळी राहुल कदम, शिवाजी कदम, अरुण यादव, संगीता पाटील, विनोद कदम, वर्षा चव्हाण, सरिता यादव, नितीन कदम, मंडल अधिकारी बळी यादव, तलाठी साहेबराव सूदेवाड उपस्थित होते.
चाैकट
विकासाला गती
उपअधीक्षक अशोक चव्हाण म्हणाले, गावठाण जमावबंदीचे दस्तऐवज प्राप्त झाल्यानंतर गावासाठीच्या विकास योजना गतीने राबविल्या जातील. तसेच राष्ट्रीय बॅँकांकडूनही या मिळकतीवर पतपुरवठा होऊ शकतो. ड्रोनद्वारे सिटी सर्व्हे झाल्यानंतर या मिळकतीचे नकाशे व प्रॉपर्टीकार्ड अभिलेख पुरावा म्हणून वापरता येणार आहे.