शरद जाधव / सांगली दुष्काळी वेदनांचा भार घेऊन जनता प्रश्नांच्या गर्दीत हरविली असताना, पालकत्व स्वीकारलेल्या मंत्र्यांनी प्रभारीपण टिकवून जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले आहे. टंचाई निवारणाच्या उपाययोजना आणि गाऱ्हाणी मांडण्यासाठी महिनोन्महिने पालकमंत्र्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. शुक्रवारी पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असले, तरी त्यांचे पुन्हा कधी दर्शन होणार याचे उत्तर पक्षीय नेत्यांकडेही नसते. त्यामुळे जिल्ह्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्तेवर असलेल्या युती शासनाला जिल्ह्याने भरभरुन दिले. कधी नव्हे ते जिल्ह्याने परिवर्तनाला साथ दिली असताना, सत्ताधारी भाजपने मात्र जिल्ह्याची झोळी मोकळीच ठेवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्न व त्यांच्या सोडवणुकीसाठी कोणी वालीच नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच्या मंत्रिमंडळात वजनदार व महत्त्वाची खाती संभाळणारे जिल्ह्यातील बरेच नेते असल्याने, कितीही तीव्र टंचाईची परिस्थिती निर्माण झाली तरी, त्यांची चुटकीसरशी सोडवणूक होत असे. विद्यमान सरकारमध्ये मात्र, जिल्ह्याला ‘ठेंगा’ मिळाला आहे. अगोदरच कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचा कार्यभार असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेच सांगलीचा ‘प्रभारी’ कारभार देण्यात आला आहे. दादांचा सांगलीकडचा दौरा आता अपवादानेच घडताना दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यातील समस्यांत दिवसेंदिवस भरच पडताना दिसत आहे. सर्वात मोठी समस्या आहे ती म्हैसाळ योजनेची. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे शेतकरी यात भरडून जात आहे. थकबाकीमुळे योजना बंद असताना, शासन मात्र, शेतकऱ्यांनी पैसे भरले तरच पाणी सोडणार, या भूमिकेवर ठाम आहे. याउलट आवर्तन लांबल्याने मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनत आहे. सरकारने यावर त्वरित तोडगा काढणे अपेक्षित असताना, आवर्तनाचे ‘भिजत घोंगडे’ ठेवण्यातच त्यांना स्वारस्य असल्याचे दिसत आहे. केवळ म्हैसाळ पाणी योजनाच नव्हे, तर आटपाडी, जतसह इतर तालुक्यांतील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी आजपर्यंत एकही दौरा केला नसल्याने पालकांकडून ‘सावत्र’पणाची वागणूक मिळत असल्याची भावना दुष्काळग्रस्तांसह जिल्ह्यातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. तेव्हा बैठकांवर बैठका : आता मंत्र्यांची प्रतीक्षा गत सरकारकाळात तीन महत्त्वाच्या विभागाच्या मंत्र्यांमुळे जिल्ह्यात नेहमीच बैठकांची रेलचेल असायची. तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम तर दर आठवड्याला बैठका घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत होते. कदम यांच्या कार्यपध्दतीमुळे अनेक अधिकारी त्यांच्या दरबारी जाण्याअगोदरच प्रश्नांची सोडवणूक करत होते. त्यांच्याबरोबरच त्यांचे सहकारी असलेले आर. आर. पाटील, जयंत पाटीलही नियमित बैठका घेत जिल्ह्यातील प्रश्नांचे निराकरण करत असत. याउलट आता मात्र मंत्र्यांची ‘चातका’प्रमाणे प्रतीक्षा करण्याची वेळ जनतेवर आली आहे.
दुष्काळ भारी आणि पालकत्व प्रभारी...
By admin | Published: February 05, 2016 1:03 AM