दिलीप मोहिते-विटा -चालू गळीत हंगामात उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळत नसल्याने जिल्हाभर सुरू असलेले ऊस दराचे आंदोलन आता दुष्काळी खानापूर तालुक्यातही पोहोचण्याचे संकेत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुष्काळी खानापूर तालुक्यातील बामणी-पारे येथील उदगिरी व नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. यामुळे विटा पोलिसांनीही स्वाभिमानीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.२०१४-१५ च्या चालू गळीत हंगामात कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न देता प्रतिटन १ हजार ९०० रुपये दर जाहीर केला आहे. त्या दराप्रमाणेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा, यासाठी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्ररूप धारण केले आहे.खानापूर तालुक्यातील बामणी-पारे येथे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा उदगिरी शुगर, तर खा. संजय पाटील यांच्या ताब्यातील नागेवाडीचा यशवंत शुगर या दोन साखर कारखान्यात उसाचे गळीत सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्यात मंगरूळ फाट्यावर आंदोलन करून विटा-तासगाव महामार्ग सुमारे दोन तास रोखून धरला होता. त्यावेळी आंदोलनकर्ते व शेतकऱ्यांची समजूत काढून ऊस दराबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, महिना संपला तरी, याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांची पुन्हा एकदा मोळी बांधून एफआरपीप्रमाणे ऊस दर पदरात पाडून घेण्यासाठी निर्णायक लढा देणार आहेत.एफआरपीप्रमाणे उसाला दर मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येडेमच्छिंद्र येथे साखरसम्राटांच्या पुतळ्याचे दहन, तर ताकारी, बहे, आष्टा (ता. वाळवा), वसगडे, पाचवा मैल, माळवाडी, आमणापूर येथे रास्ता रोको करण्यात आला. कवठेएकंद येथेही सोमवारी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र जिल्ह्यातील जमावबंदी आदेशामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने अनुचित प्रकार घडला नाही. याच पार्श्वभूमीवर त्यामुळे खानापूरसारख्या दुष्काळी टापूतही नजीकच्या काळात आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विटा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष केंद्रित केले आहे.ऊस दराच्या प्रश्नावर केवळ कागदी घोडे नाचवून एका बाजूला शेतकऱ्यांना कोरडी सहानुभूती, तर दुसऱ्या बाजूला कोणतीच कृती न करता कारखानदारांना संरक्षण देण्याची दुटप्पी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे सरकार व साखर कारखानदारांच्या या भूमिकेचा निषेध करीत असून, सरकारला याची किंमत मोजावी लागेल.- अॅड. सुभाष पाटीलसरचिटणीस, शेकापएफआरपीप्रमाणेच दर द्या : हिंमतराव जाधवखानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने व पुरेसे पाणी नसतानाही ऊस पीक घेतले आहे; परंतु साखरसम्राटांनी शासनाच्या एफआरपीप्रमाणे दराला बगल देऊन प्रतिटन १ हजार ९०० रुपये देण्याची घोषणा करीत त्याप्रमाणे रक्कम देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. एफआरपीप्रमाणे दर न दिल्यास आता उदगिरी व नागेवाडी कारखाना कार्यक्षेत्रातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करणार आहे, असा इशारा खानापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हिंमतराव जाधव यांनी दिला.
दुष्काळी टापूतही आंदोलन पेटणार
By admin | Published: January 14, 2015 10:23 PM