जत पूर्व व उत्तर भागात डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. चांगल्या दर्जाची परदेशात निर्यात होणारी डाळिंब ही उत्तर भागाची नव्याने ओळख तयार होत आहे. वाळेखिंडी (ता. जत) येथील डाळिंब बागायतदार शेतकरी विलास शिंदे यांनी २२ लाख रुपयांची कमाई केलीआहे. वाळेखिंडी (ता. जत) या गावात पूर्वी पारंपरिकच उदा. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मका हीच पिके घेतली जात होती. कालांतराने डाळिंब बागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. आधुनिक व निर्यातक्षम डाळिंब बागाच्या शेतीचे तंत्रज्ञान माजी सरपंच संभाजीराव शिंदे यांनी अवगत केले. त्यांनी हे तंत्रज्ञान स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही डाळिंब बागांसाठी प्रवृत्त केले. विलास अशोक शिंदे यांना वडिलांच्या निधनानंतर २००२ मध्ये एसटी महामंडळामध्ये कंडक्टरची नोकरी मिळाली. नोकरी जरी मिळाली तरी त्यांना शेतीचे क्षेत्र खुणावत होते. त्यामुळे स्वत:च्या दीड एकर क्षेत्रात १४ बाय १० अंतरावर सुरुवातीस भगव्या जातीच्या डाळिंबाची एकूण ४०० रोपांची लागवड केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात बागांचा बहर घेतला. त्यानंतर पाणी एक दिवसाआड पुरविले जाते. डाळिंबाचे क्षेत्र सर्वत्र वाढले तरी, हल्ली बिब्ब्या, तेल्या यासारख्या रोगाला बागा बळी पडत आहेत. याचा विचार विलास शिंदे यांनी करून चांगल्या प्रतीची औषध फवारणी केली. हस्त नक्षत्रात उष्ण व दमट हवामान असल्याने बागावर बिब्ब्या व तेल्या रोगाचा हल्ला लगेच होतो. त्यासाठी हवामानाचा अगोदरच अभ्यास शिंदे यांनी केला. त्यामुळे ४०० डाळिंबाची झाडे रोगाला बळी पडली नाहीत. या ४०० डाळिंबाच्या झाडातून त्यांनी सुरुवातीला पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.काहीवेळा डाळिंबाच्या दराबाबत व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पन्न चांगले काढले तरी बाजारपेठेचा अभ्यास असावा लागतो. पहिल्या ४०० डाळिंबाच्या झाडांपासून उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळाल्याने पुन्हा दुसऱ्या दीड एकरात आणखी ४०० डाळिंबाच्या झाडांची लागवड शिंदे यांनी केली. ही झाडे १२ बाय ७ या अंतरावर लावली. या ४०० झाडांची जोपासना पूर्वीसारखीच नियोजनबद्धरित्या केली. आता एकूण ८५० डाळिंबाची झाडे आहेत. सर्व झाडांना ठिबक संचनाद्वारे पाणी दिले जाते. पाण्याची पातळी कमी होत आहे. तरीही बोअरवेल घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करुन सध्या ८५० डाळिंबाच्या झाडांची काळजी घेतली आहे. येत्या मे महिन्यात पुन्हा बागांची छाटणी करून जून महिन्यात बागांचा बहर शिंदे धरणार आहेत.सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिंदे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना डाळिंब बागा लावण्यासाठी मोलाची साथ दिली आहे. त्यामुळेच वाळेखिंडी डाळिंब बागायतदारांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.शेती व्यवसायात चुलत बंधू हणमंत शिंदे, माजी सरपंच संभाजी शिंदे, पत्नी अश्विनी, आई अलकाताई यांची मोलाची साथ मिळत आहे. शेतीबरोबरच पाण्याच्या व्यवस्थापनासाठी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली विलास शिंदे यांनी जोराचे प्रयत्न सुरू आहेत. वाळेखिंडी विशेषत: जत उत्तर भागातील डाळिंबाला योग्य भाव राहण्यासाठी डाळिंब बागायतदार संघ स्थापन करणार असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. - भागवत काटकर दुष्काळ हा जत तालुक्याला पाचवीला पुजलेला. या दुष्काळी जत तालुक्यात अत्यंत कमी पाण्यावर डाळिंब बागा फुलविण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. डाळिंब बागांना प्रतिकूल हवामान, कमी पाणी यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना डाळिंबापासून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. विशेषत: जत पूर्व व उत्तर भागात डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. चांगल्या दर्जाची परदेशात निर्यात होणारी डाळिंब ही उत्तर भागाची नव्याने ओळख तयार होत आहे. वाळेखिंडी (ता. जत) येथील डाळिंब बागायतदार शेतकरी विलास अशोकराव शिंदे यांनी सलग ७ वर्षे डाळिंबाचे उत्पन्न घेत २२ लाख रुपयांची कमाई केलीआहे. वडिलांच्या निधनानंतर २००२ पासून एसटी महामंडळात कंडक्टरची नोकरी सांभाळत आव्हानात्मक बनलेल्या डाळिंबाच्या शेतीत मिळवलेले हे उत्तुंग यश सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. त्यांचा या कामाचा आदर्श आता इतर शेतकरी घेताना दिसत आहेत...
दुष्काळातही डाळिंब बाग फुलवणारे
By admin | Published: March 25, 2016 11:12 PM