लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : दुष्काळी परिस्थिती असूनही हे सरकार झोपले आहे. सरकारने केलेल्या या कर्जमाफीबद्दल शेतकरी समाधानी नाही. विजेची बिले वाढवायचे काम सरकारने केले. शेतकºयांच्या मुळावर हे सरकार उठले आहे. दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आल्यामुळे या सरकारचा आता एकत्र येऊन प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील यांनी केले.तासगाव येथे आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ते मार्गदर्शन शिबिर व मेळाव्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे उपस्थित होत्या. पाटील म्हणाले, एवढा कडक दुष्काळ पडूनही सरकारला शेतकºयांची दया आली नाही. कर्जमाफीचा शाब्दिक खेळ सुरू आहे. मात्र यांना आता प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपणाला एकत्र यावे लागेल. आर. आर. पाटील यांना जाऊन दोन वर्षे झाली, मात्र महाराष्ट्रातील जनता अजूनही आबांना विसरली नाही. आज आबा असते तर त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले असते. दुष्काळ हटविण्यासाठी सरकारकडून तोकडे प्रयत्न सुरू आहेत, तर विरोधी बाकावर असलेल्या आमदार सुमनताई पाटील मात्र दुष्काळग्रस्तांसाठी उपोषण करण्यासाठी बसणार आहेत. आमदार सुमनताई पाटील व आम्ही तालुक्यातील द्राक्षबागायतदारांना तरी कमीत कमी चार लाखांची कर्जमाफी द्यावी, यासाठी मागणी केली होती; मात्र सरकारने अडवणुक केली.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते म्हणून डॉ. संजय ठिगळे, डॉ. सूरज चौगुले, मधुकर पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, कार्यकर्ता जनतेच्या नजरेत आश्रयदाता म्हणून असली पाहिजे. चांगला वक्ता होण्यासाठी वाचन वाढवा. राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या अध्यक्षांची निवड व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. स्मिता पाटील यांनी आभार मानले. यावेळी बाजार समितीचे सभापती रवी पाटील, पंचायत समिती सभापती मायाताई एडके, उपसभापती संभाजी पाटील, पतंगबापू माने, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते.पाण्यासाठी श्रेयवादजयंत पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यात आबांनी पाणी फिरवले. त्यांनी जनतेला कधीच पाण्यासाठी वेठीस धरले नाही. त्याच तालुक्यात आज पाण्याचे राजकारण केले जात आहे आणि त्याचे वाटप करतानाही श्रेयवाद सुरू आहे. विरोधकांकडून राजकारण सुरु आहे.
दुष्काळी परिस्थितीत शासन झोपलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:46 PM