सांगली : शासनाचे आदेश धाब्यावर बसवून देशभर आॅनलाईन औषध विक्रीत वाढ होत असल्याच्या निषेधार्थ केमिस्ट संघटनेने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील दोन हजारावर औषध विक्रेत्यांनी या आंदोलनात भाग घेतला. संघटनेने बुधवारी सांगली शहरातून मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. विविध वस्तूंची आॅनलाईन विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवरून आता औषधांचीही विक्री सुरू झाल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषधी संघटनेने बुधवारी देशव्यापी बंद पुकारला होता. त्यास जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. सांगली शहरातून संघटनेच्या सदस्यांनी दुचाकी रॅली काढली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संजीव साक्रीकर यांना निवेदन देऊन नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे औषध विक्री केली जात असून त्याद्वारे नार्काेटिक ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सायरपसारख्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेण्यास धोकादायक असणाऱ्या औषधांची विक्री सुरू आहे. कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे मिळत असल्याने त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कंपन्यांच्या या औषध विक्रीमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून, युवकांकडून या औषधांच्या गैरवापरचा धोका आहे. आंदोलनात महाराष्ट्र औषध परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील, विनायक शेटे, भरत सावंत, दीपक मगदूम, विशाल दुर्गाडे, अविनाश पोरे, बिपीन हरूगडे, सुनील पाटील, संदीप गोटखिंडे, सचिन सकळे, महावीर खोत, वृंदा लोखंडे, स्मिता नंदगावकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)आॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात संघटनेने पुकारलेल्या बंदला बुधवारी जिल्ह्यातून मिळालेला प्रतिसाद पाहता, शासनाला या बेकायदेशीर औषध विक्रीविरोधात निर्णय घ्यावाच लागेल. औषध विक्रेत्यांच्या व्यवसायाबरोबरच समाजाचे आरोग्य संतुलित राहण्यासाठी आजचे आंदोलन होते. यापुढेही या प्रश्नावर तीव्र लढा उभारला जाईल.- विनायक शेटे, जिल्हाध्यक्ष, केमिस्ट संघटना, सांगलीआॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात संघटनेने पुकारलेल्या या जिल्हा बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. यात जिल्ह्यातील दोन हजार औषध विक्रेते सहभागी झाले होते. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी संघटनेच्यावतीने मूक मोर्चा, दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
औषध दुकानदारांचा जिल्ह्यात कडकडीत बंद
By admin | Published: October 14, 2015 11:16 PM