वाळवा : स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतिकारी ऐतिहासिक वारसा असलेल्या वाळवा तालुक्याचे विभाजन करुन वाळव्याचे नाव पुसून टाकण्याचा उद्योग राजकारण्यांनी चालविला आहे. हा प्रयत्न कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी वाळव्याचा युवक प्रसंगी आपले रक्तही सांडेल, अशी स्पष्टोक्ती सरपंच गौरव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.नायकवडी म्हणाले की, वाळवा विधानसभेचे नामकरण करून ते इस्लामपूर विधानसभा केले. त्यातही राजकीय हेतूच होता. त्यावेळी आम्ही विरोध नको, म्हणून गप्प राहिलो. क्रांतिकारी वाळव्याचे नाव क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे, प्रतिसरकारच्या लढ्याने ब्रिटिश पार्लमेंटरी बोर्डाला नोंद आहे, त्या वाळवा गावचे तालुका म्हणून असलेले नाव पुसून टाकण्याचा घाट विरोधकांनी सुरू केला आहे, असे खात्रीलायकरित्या समजले आहे. आज वाळव्याचे विभाजन करुन आष्टा तालुका निर्माण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. आष्टा तालुका होण्यास आमचा विरोध नाही, पण या नवीन आष्टा तालुक्यात वाळवा गावाचा समावेश करुन ‘वाळवा तालुका’ पुसण्याचा जो घाट घातला आहे, त्याला मात्र आमचा निश्चितच विरोध आहे. वाळवा तालुका हे अस्तित्व कायम राहिलेच पाहिजे. त्यासाठी वाळवा गाव आष्टा तालुक्यात समाविष्ट होता कामा नये. वाळव्याच्या विकासाला कायमच सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी विरोध केला आहे, हे वाळव्याला जोडणाऱ्या रस्त्यांवरुन गेली २५ वर्षे दिसून येतच आहे. यावेळी शिवाजी सापकर, राजेंद्र साळुंखे, विश्वास थोरात, नंदू पाटील, प्रताप शिंदे, मोहन सव्वाशे, पोपट फाटक, बाळासाहेब आचरे, विश्वास थोरात आदी उपस्थित होते. (वार्ताहर)प्रसंगी रक्त सांडूज्या क्रांतिकारी डॉ. नागनाथअण्णांनी वाळव्याचे नाव समता, बंधुता व सद्विचाराने ओळख पटवून देण्यास केले, त्याच वाळव्याचा विकास राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन कायमस्वरुपी थांबविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाळवा तालुक्याचे नाव बदलण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी प्रसंगी रक्त सांडू व दुसऱ्या क्रांतीला प्रारंभ करु, असा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला.
वाळव्याच्या विभाजनाचा डाव : नायकवडी
By admin | Published: November 05, 2014 9:42 PM