सुशांत घोरपडे - म्हैसाळ .मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे नदीकाठावरील कनकेश्वर मंदिर व धरण परिसरात रात्रीच्यावेळी व सुट्टीच्यादिवशी पार्ट्या रंगू लागल्या आहेत. मंदिर व नदीकाठचा निसर्गरम्य परिसर यामुळे येथे नेहमीच भाविक व पर्यटकांची वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून येथील बिघडलेले वातावरण पाहून भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे. म्हैसाळपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कनकेश्वर मंदिर व नदीकाठचा परिसर निसर्गरम्य आहे. सांगली, कोल्हापूर, कागवाड, अथणी या भागातून अनेक पर्यटक व शाळेच्या सहली येथे येत असतात. म्हैसाळ धरणाच्या खालच्या बाजूला काही दरवाजे बंद असल्याने या खोल्या रिकाम्या आहेत. या ठिकाणी रात्री चूल मांडून जेवण बनविले जाते. त्याचबरोबर मद्य प्राशन करून रंगारंग पार्ट्या केल्या जातात. पार्टी व जेवणानंतर रिकाम्या बाटल्या तेथेच फेकल्या जातात. यामुळे पर्यटकांमधून व भाविकांतून याबद्दल संताप व्यक्त होत आहे. पोलीस व ग्रामपंचायतीने या परिसरात एखादा अनुचित प्रकार घडण्याआधीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
कृष्णा काठावर रंगतोय पार्ट्यांचा फड
By admin | Published: January 21, 2015 10:01 PM