सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाची दुहेरी वाहतूक सोमवारपासून सुरू झाली. मात्र, काम अर्धवट स्थितीत असल्याने वाहतुकीच्या वर्दळीने धुळीचे लोट हवेत उडत आहेत. वायूप्रदूषणाची कमाल पातळी गाठत या पुलाचे कवित्व अद्याप सुरूच आहे.चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबर संपत आला तरी अजून पूर्ण झालेले नाही. १ ऑक्टोबरपासून अर्धवट स्थितीत असलेला एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावरून अवजड वाहनांना बंदीचा फलक लावला तरी मोठमोठे कंटेनरही यावरून धावत आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. एका बाजूने वाहतूक सुरू असताना दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू होते. ते काही प्रमाणात पूर्ण करून आता दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.मात्र, दोन्ही बाजूने वाहनांची वर्दळ वाढल्याने तसेच येथील डांबरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने धुळीचे लोट हवेत उडत आहेत. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाने येथे कमाल मर्यादा ओलांडली आहे. कामाच्या मुदतवाढीच्याही कमाल मर्यादा या पुलाने ओलांडल्या आहेत. अनेकदा मुदतवाढ घेऊनही अजून काम पूर्णत्वास गेलेले नाही. केवळ वाहतूक सुरू करण्याची औपचारिकता पार पाडली गेली.पुलाचे काम प्रदीर्घ काळ रेंगाळत राहिले. आता नोव्हेंबर २०२४ पर्यंतची मुदत ठेकेदाराला देण्यात आली आहे. त्यामुळे ओबडधोबड रस्त्यावरून वाहतुकीची कसरत नागरिकांना आणखी काही दिवस करावी लागणार आहे.
नागरिकांची नाराजी कायमरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांमधून नाराजी कायम आहे. शहरातील अन्य खराब रस्त्यांसह पुलाच्या खड्डेमय रस्त्यामुळे शारीरिक दुखणे नागरिकांना सोसावे लागत आहे.
चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. लवकरच या पुलाची वास्तुशांती घालून जेवण करण्यात येणार आहे. जेवण व वास्तुशांतीसाठी वस्तू स्वरूपात मदत करावी, असे आवाहन आम्ही संघटनेच्या वतीने केले आहे. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली जिल्हा