लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल शिंदेमळा येथील दुधनकर हॉस्पिटलला महापालिकेने एक लाखाचा दंड केला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
शिंदे मळा येथील दुधनकर हॉस्पिटलने रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा हा महापालिकेच्या घंटागाडीत टाकला होता. कचरा डेपोवर हा कचरा गेल्यानंतर प्रकार उघडकीस आला. दुधनकर हाॅस्पिटलने घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याची माहिती मिळताच आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी त्याची पडताळणी केली. हा बायोमेडिकल कचरा दुधनकर हॉस्पिटलचाच असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार दुधनकर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड करण्यात आला आहे. या दंडाची वसुली स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी केली.
काही दिवसांपूर्वी एका डायग्नोस्टिक सेंटरने वैद्यकीय कचरा कंटेनरमध्ये टाकला होता. हा प्रकार नागरिकांनीच उघडकीस आणला होता. त्यांनाही लाखाचा दंड करण्यात आला. शहरातील रुग्णालयाकडून वैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या काळात त्यातून संसर्गाची शक्यता अधिक असल्याने महापालिका प्रशासनाकडून कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
चौकट
कचरा उघड्यावर टाकल्यास कारवाई
महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांनी वैद्यकीय कचरा उघड्यावर किंवा कचरा कंटेनर, घंटागाडीमध्ये न टाकता यासाठी नियुक्त खासगी एजन्सीकडे द्यावा. कचरा उघड्यावर टाकल्यास रुग्णालयावर दंडात्मक कारवाईबरोबर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.