कवठेमहांकाळ : भाजपमध्ये असूनही काही नेते पक्षापासून लांब आहेत. भविष्यात केंद्रात आणि राज्यात भाजपच सत्तेवर येणार आहे. त्यामुळे आता त्यांनी पक्षापासून दूर राहू नये. विकासकामांसाठी सर्वजण एकत्र येऊन काम करू, असे प्रतिपादन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता खासदार संजयकाका पाटील यांनी केले.कवठेमहांकाळ नगरपंचायतीतर्फे खासदार संजयकाका पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून महांकाली साखर कारखाना ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंतच्या रस्ता दुभाजकामध्ये पथदिवे व व हायमास्ट बसवण्याच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
खासदार पाटील म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच सत्तेवर येणार आहे. जिल्ह्यातील काही नेते अधिकृतरित्या भाजपमध्ये असूनही काही कारणांमुळे दुरावले आहेत. सध्या सर्वत्र भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे या मंडळींनी भाजपपासून लांब न जाता भविष्यातील संधी ओळखून भाजपमध्ये सामील व्हावे. सर्वांनी मिळून शहराचा विकास केला पाहिजे.
नगराध्यक्षा सविता माने म्हणाल्या, खासदार निधीतील विकासकामांची सुरुवात लवकरच करून कवठेमहांकाळ शहर स्वच्छ व सुंदर बनवू. मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी स्वागत केले. पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपनगराध्यक्षा स्वाती पाटील, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, माजी सभापती अनिल शिंदे, दादासाहेब कोळेकर, हायुम सावनूरकर, आरोग्य सभापती अय्याज मुल्ला, बांधकाम सभापती सुनील माळी, अनिल लोंढे, महावीर माने, शेवंता शेंडगे, दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील, लालासाहेब वाघमारे, रणजित घाडगे उपस्थित होते.
विकासाला सहकार्ययावेळी अनिता सगरे म्हणाल्या, खासदार संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ शहराच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे. यापुढेही त्यांनी विकासासाठी मदत करावी.