लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दलितांवर अत्याचार वाढण्यास आरक्षण कारणीभूत ठरत आहे. आरक्षणाने दुजाभाव होत असल्याचे मत तयार होत आहे. त्यामुळे बहुसंख्येने असलेल्या समाजालाही आरक्षण देण्यासाठी आरक्षणाच्या टक्केवारीचा कोटा वाढविण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय मंत्री समितीपुढे आपण केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, आरक्षणामुळे दलितांनाच सवलती मिळत असल्याची भावना आरक्षणापासून वंचित समाजघटकांमध्ये होत आहे. कायद्यानुसार आता आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यावर घालवता येत नाही. त्यामुळे हा कोटाच ७५ टक्के करण्याचा विचार मी मांडला आहे. महाराष्टÑात मराठा समाजासाठी १६ टक्के आणि उर्वरित ९ टक्क्यांमध्ये इतर समाजांनाही आरक्षण देता येईल. त्याचबरोबर विविध राज्यातील ठाकूर, गुज्जर, पटेल, राजपूत अशा बहुसंख्येने असणाºया समाजालाही समाविष्ट करून घेता येणे शक्य आहे. ७५ टक्के आरक्षणाचा कोटा झाल्यानंतर उर्वरित २५ टक्के जागांमध्ये खुल्या स्पर्धा होतील.महाराष्टÑात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मताशी मी सहमत आहे. मराठा समाजाने केलेली आंदोलने स्तुत्य आहेत. त्यामध्ये कुठेही हिंसा नव्हती. आरक्षण मागतानाही त्यांनी अन्य समाजघटकांच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी सकारात्मक मागणी केली आहे. सध्याच्या स्थितीत केवळ राज्य शासनाने निर्णय घेऊन तो न्यायालयीन लढाईत टिकणार नाही. न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी संसदेत त्याविषयीच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. असा बदल करता येऊ शकतो, ही बाब मीच मंत्रिमंडळ समितीपुढे मांडलेली आहे. पूर्ण ताकदीनीशी मी त्याचा पाठपुरावा करीत आहे.समाजात आजही जातीव्यवस्था दिसून येत असली तरी, गेल्या अनेक वर्षांत सामाजिक एकोपा घडविणाºया गोष्टीही घडत आहेत. ही बाब सकारात्मक आहे. मी दलित पॅँथरचा प्रमुख म्हणून काम करत असताना राज्यभरातील अनेक गावामध्ये मला मराठा व अन्य समाजाचे नेते मंदिरांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावत होते. अनेक जाती-जातींमध्ये आता रोटी-बेटीचे व्यवहारही झाले आहेत. हे सर्व बदल चांगले आहेत. काही लोकांच्या कट्टरतेमुळे जातीव्यवस्था टिकून आहे. जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी आता विविध समाजघटकांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले.ब्राह्मणच मराठ्यांना आरक्षण देणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असले तरी त्यांचे नेतृत्व व्यापक आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. पूजेला, श्राद्धाला किंवा कोणत्याही विधीला आवश्यक असणारा ब्राह्मणच आता आरक्षणालाही आवश्यक आहे, असे मत आठवलेंनी व्यक्त केले. फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात घेतलेले निर्णय हे सर्व समाजघटकांना न्याय देणारे असेच आहेत. मराठा समाजाच्या मोर्चानंतर त्यांच्यासाठी घेतलेले निर्णयही अत्यंत चांगले आहेत. या निर्णयांचे मी स्वागत करतो. यापुढेही अशाच कामांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
दलितांवरील अत्याचार आरक्षणामुळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:40 AM