तासगाव : सोमवारी दिवसभर तालुक्यासह जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. जिल्ह्यातील सुमारे ४० टक्केद्राक्षांची काढणी झालेली आहे. उर्वरित साठ टक्केद्राक्षबागांपैकी नोव्हेंबरपासून पीक छाटणी केलेल्या बागांना ढगाळ हवामानामुळे भुरी रोगाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांत चिंंतेचे वातावरण आहे. तासगाव तालुक्यात महिन्याभरापासून द्राक्षाची काढणी सुरू झाली आहे. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत छाटणी घेतलेल्या ४० टक्केद्राक्षबागा आहेत. या दोन महिन्यात छाटणी घेतलेल्या बागांतील द्राक्षांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र आॅक्टोबरपासून पुढे छाटणी झालेल्या द्राक्षबागांना अद्याप मार्केटची प्रतीक्षा आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान असल्यामुळे याचा फटका द्राक्षबागांना बसण्याची चिन्हे दिसत आहे. विशेषत: नोव्हेंबर महिन्यानंतर पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना भुरी रोगाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामान आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी व्यक्त केला आहे. ढगाळ हवामान कायम राहिल्यास द्राक्षांना तडे जाण्याचीही शक्यता आहे. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्षाला बसू नये, यासाठी द्राक्ष बागायतदारांकडून पुन्हा औषध फवारणीसाठी लगबग सुरू झाली आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी ढगाळ हवामानाला घाबरुन न जाता, तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आर्वे यांनी केले आहे.ढगाळ हवामान आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. मात्र पावसाची शक्यता नाही. सतत ढगाळ हवामान राहिल्यास भुरीची शक्यता आहे. अशा वातावरणात द्राक्षबागेला जास्त पाणी देऊ नये. ऊन पडले नाही तर द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मऊ पडलेल्या द्राक्षबागेला पोटॅशयुक्त खते द्यावीत.- सुभाष आर्वे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.तालुक्यातील द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. बहुतांश द्राक्षांची काढणी सुरू व्हायची आहे. मात्र ढगाळ हवामानाचा फायदा घेत, परराज्यातील व्यापाऱ्यांकडून दर पाडून द्राक्षांची मागणी केली जाते. सध्या चार किलोच्या पेटीचा सरासरी दर दीडशे ते अडीचशे रुपये आहे. व्यापाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडून शेतकऱ्यांनी कमी दराने द्राक्षांची विक्री करू नये.- सतीश झांबरे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव
ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत...
By admin | Published: January 18, 2016 11:26 PM