मिरज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रवेश बंद केल्याने महाराष्ट्र एसटीच्या फेऱ्या कागवाड सीमेपर्यंत सुरू आहेत. मात्र, कर्नाटकातून एसटी फेऱ्या सुरू असल्याने मिरजेत प्रवासी आणून सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटक कागवाड सीमेवर प्रवेशबंदी आहे. मात्र, कर्नाटकातून येणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश खुला, असे परस्पर विरोधी चित्र आहे.
गेल्या महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सोमवारपासून मिरजेतून येणाऱ्या एसटी प्रवाशांना कर्नाटकात प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह तपासणी अहवालाची सक्ती करण्यात आली आहे. कागवाड सीमेवर महाराष्ट्रातून येणाऱ्या एसटी व खाजगी वाहनांना रोखण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रातून एसटी बसमधून येणाऱ्या प्रवाशांना यापूर्वी प्रवेश देण्यात येत होता. मात्र, आता कोरोना निगेटिव्ह अहवाल नसल्यास एसटी प्रवाशांनाही सीमेवर एसटीतून उतरविण्यात येत आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील प्रवाशांवर निर्बंध घातले असले तरी कर्नाटकातून येणाऱ्या बस म्हैसाळ सीमेवरून विना अडथळा ये- जा करीत आहेत. मात्र, कर्नाटकातून प्रवासी घेऊन मिरजेत येणाऱ्या कर्नाटक बस जाताना कागवाड सीमेपर्यंतच प्रवासी नेत आहेत. मिरज आगारातून दररोज जमखंडीला जाणाऱ्या केवळ चारच फेऱ्या आहेत. मिरजेशिवाय जिल्ह्यातील इतर आगाराच्याही कर्नाटकात मोजक्याच फेऱ्या आहेत. मात्र, सीमेवर कर्नाटक प्रवेशासाठी निर्बंध लागू करण्यात आल्याने महाराष्ट्र एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून कागवाड सीमेपर्यंतच प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे एसटीचे मिरज आगार व्यवस्थापक अप्पासाहेब खांडेकर यांनी सांगितले.
चाैकट
कच्च्या रस्त्याने कर्नाटकात
कर्नाटक प्रशासनाने कागवाड नाक्याजवळ तपासणी सुरू केल्याने अनेक खाजगी वाहने नरवाडमार्गे कच्च्या रस्त्याने कर्नाटकात जात आहेत. म्हैसाळ सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्यांवर महाराष्ट्र सरकारचे कसलेच बंधन नाही. प्रवेशबंदीमुळे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटल्याचे चित्र आहे.