मिरज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले महिनाभर कर्नाटकात प्रवेश बंद केल्याने महाराष्ट्र एसटीच्या फेऱ्या कागवाड सीमेपर्यंतच सुरु आहेत. यामुळे कर्नाटकातून येणाऱ्या एसटी गाड्यांनाही प्रवेशबंदी करण्यांत आल्याने कागवाड सीमेपर्यंत प्रवासी सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील प्रवाशांना कागवाड सीमेवर तपासणीची सक्ती केली जात आहे. पण कर्नाटकातून येणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश खुला आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी गेले महिन्याभर मिरजेतून येणाऱ्या एसटी प्रवाशांना कर्नाटकात प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह तपासणी अहवालाची सक्ती केली आहे. यासाठी कागवाड सीमेवर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना रोखण्यात येत आहे. एसटी बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांनाही तपासणीची सक्ती करुन कोरोना निगेटिव्ह अहवाल नसल्यास प्रवाशांना कागवाड सीमेवर उतरविण्यात येते. यामुळे मिरजेतून जाणाऱ्या एसटी फेऱ्या बंद झाल्या आहेत. बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील प्रवाशांवर निर्बंध घातले तरी कर्नाटकातून येणाऱ्या बसेसची म्हैसाळ सीमेवरुन विना अडथळा ये-जा सुरु होती. मिरजेत येणाऱ्या कर्नाटक बसेस जाताना कागवाड सीमेपर्यंतच प्रवासी नेत असल्याने मिरज स्थानकात संतप्त प्रवाशांकडून कर्नाटक एसटी रोखण्याचे प्रकार घडल्याने दोन आठवड्यापासून कर्नाटक एसटीलाही महाराष्ट्रात प्रवेश बंद केली आहे. मिरज आगारातून दररोज जमखंडीला जाणाऱ्या चार फेऱ्या व जिल्ह्यातील इतर आगाराच्याही कर्नाटकात जाणाऱ्या फेऱ्या बंद आहेत. दोन्ही राज्यातील प्रवाशांना सीमेवर सोडण्यात येत असून कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची ने आण करण्यासाठी मिरजेतून कागवाडपर्यत शहरी बस सुरु आहेत. कागवाड सीमेपर्यतच प्रवासी वाहतूक सुरु असल्याने एसटीचे नुकसान होत आहे. कर्नाटकातून येणाऱ्यांवर निर्बंध नसल्याने महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंध हटविण्याची मागणी आहे. प्रवेशबंदीमुळे कर्नाटकातून मिरजेत येणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटल्याचे चित्र आहे.
चाैकट
मिरज पूर्व भागात कर्नाटक राज्यांला जोडणारे मिरज - मंगसुळी, शिंदेवाडी - केंपवाड, खटाव - मदभावी, जानराववाडी - मदभावी हे सर्वच रस्ते मार्चपासून खोदून, बांध घालून, काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आले होते. आता रस्त्यावरील अडथळे दूर करण्यांत आले आहेत. मात्र मिरज कागवाड व बेडग मंगसुळी रस्त्यावर चेकपोस्टवर चारचाकीतून येणा-यांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पाहणी करण्यात येत आहे.