कोकरुड : शिराळा पश्चिम भागात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यातच चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग ८२४० पर्यंत कमी केल्याने पाण्याची पातळी कमी झाली. महसूल विभागाच्या वतीने पुरातील घरांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. भाष्टेवाडी, कोकणेवाडीतील ग्रामस्थांना अन्यत्र हलविले आहे.
शिराळा पश्चिम भागात शनिवार, रविवार दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाची संततधार सुरूच आहे. नदीच्या पुराची पातळी कमी झाल्याने आरळा, मराठवाडी, काळुद्रे येथील उबाळे वस्ती, पणुब्रे वारुण, चरण, मोहरे, नाठवडे, शेडगेवाडी फाटा, खुजगाव, चिंचोली, कोकरुड येथील घरांत पाणी शिरलेल्या कुटुंबांचे, तसेच मुसळधार पावसाने पडलेल्या घरांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुरात अडकलेल्या कुटुंबांची संख्या दोनशेच्या आसपास आहे. दरड कोसळण्याच्या भीतीने शनिवारी भाष्टेवाडी येथील सर्व कुटुंबांना मंदिरात हलवले असून कोकणेवाडी येथील कुटुंबांचेही रविवारी स्थलांतर सुरू हाेते.