सांगली : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळी भागातून चारा छावणीचे प्रस्ताव आले, तर त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम सध्या तरी आपल्या अजेंड्यावर दोन विषय असल्याचे आवर्जून सांगितले होते. त्यात निवडणूक व जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिनाभराच्या कालावधीनंतर मंगळवारी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. आता २३ मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. या कालावधित प्रशासनातर्फे दुष्काळी उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे.शासकीय आकडेवारीनुसार सध्या दोनशेहून अधिक ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा चालू आहे, तर साडेआठशेहून अधिक वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील तीन पाणी योजनांची आवर्तने सुरू असल्याने या योजनांचा लाभ मिळणाऱ्या भागातील टंचाई आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली आहे. याउलट जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह इतर तालुक्यातील पाणी न पोहोचलेल्या भागात मात्र, उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाई वाढतच आहे.
यावर उपाययोजना म्हणून पाण्याचे टॅँकर मंजूर करण्याचे अधिकार यापूर्वी थेट जिल्हाधिकाऱ्यांना होते. मात्र, आता प्रांताधिकारी, तहसील पातळीवरच टॅँकरना मंजुरी मिळत आहे. त्यामुळे कमी कालावधित टॅँकरची मागणी पूर्ण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आता दुष्काळी उपाययोजनांची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत.