कोकरूड : गेल्यावर्षी वाकुर्डे (बु) योजनेतून शेतीला पाणी देऊनही शेतीपंपांची वीज बिले मोठ्या शेतकऱ्यांनी जाणूनबुजून थकित ठेवली आहेत. त्यांना पंधरा दिवसांची मुदत द्या. त्या कालावधित पैसे आले नाहीत, तर ही कनेक्शन्स ताबडतोब तोडा. मात्र दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी वारणा नदीचे पाणी त्वरित मोरणा नदीत सोडावे, असे आदेश आ. शिवाजीराव नाईक यांनी दिले. ते तालुका समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते.आ. नाईक म्हणाले, गेल्यावर्षी अनेक प्रकारचे प्रयत्न व आंदोलनानंतर वाकुर्डे योजनेसाठी पाणी मोरणा नदीला पाटबंधारे विभागाने सोडले होते. चालूवर्षी अत्यंत अपुरा पाऊस झाल्याने तालुक्याच्या मेणी, येळापूर, गुढे, पाचगणी, उत्तर विभाग व मोरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील पिके हातची गेली आहेत. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बीदेखील अडचणीत आहे. वाकुर्डे योजनेतून शेतीला पाणी मिळणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी मोरणा नदीत वारणा नदीचे पाणी सोडल्याने उत्पादनात दुप्पट वाढ झाली होती. छोट्या शेतकऱ्यांनी वीजबिले भरली; मात्र अद्याप २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी थकवले आहेत. आता मोठ्या ठगांचीच कनेक्शन तोडावीत. मात्र कोणत्याही परिस्थितीत या विभागाच्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी त्वरित वारणा नदीचे पाणी मोरणेत सोडावे.नाईक म्हणाले, विद्युत महामंडळाने हातेगाव व खिरवडे पंप हाऊस भगीरथ योजनेतून दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करून त्वरित विद्युत कनेक्शन द्यावीत. यावेळी १ डिसेंबरला वारणेचे आवर्तन सुरू होणार असून, त्यामधून वाकुर्डेला पाणी देणार असल्याची माहिती वारणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी दीपक चव्हाण, सुखदेव पाटील, संग्राम पाटील, आनंदराव पाटील, दगडू सावंत, दीपक पाटील, संदीप तडाखे, कृषी अधिकारी भगवान माने, प्रादेशिक परिवहन विभागाचे रा. आ. काटकर उपस्थित होते. (वार्ताहर)
दुष्काळामुळे वारणेचे पाणी मोरणेत सोडा
By admin | Published: November 05, 2015 10:55 PM