दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यात दुष्काळाच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळाची दाहकता जाणवत असताना, पंचायत समितीतील पदाधिकारी मात्र केवळ खुर्चीभोवतीच घुटमळत असल्याचे चित्र आहे.तासगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. सर्वांना संधी या न्यायाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभापती आणि उपसभापती पदाची संगीत खुर्ची केली आहे. पदाधिकारी खुर्चीवर बसून अनुभव येईपर्यंत पायउतार होतात. परिणामी प्रशासनाचा अभ्यास आणि अनुभव नसल्याने भोंगळ कारभाराचे चित्र चव्हाट्यावर आले आहे.तालुक्यात दुष्काळाची मोठी भीषण परिस्थिती आहे. तासगाव पूर्व भाग होरपळून निघत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची फरफट सुरु आहे. टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरु असला तरी हे पाणी पुरेसे नाही. जनावरांनादेखील पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. जनावरांना चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अद्याप डोंगरसोनी वगळता एकाही ठिकाणी चारा छावणी सुरु झालेली नाही. पंचायत समितीच्या कारभाऱ्यांना मात्र दुष्काळाचा विसर पडला आहे. पद मिळावे, यासाठी नेत्यांकडे सातत्याने अट्टाहास करणारे पदाधिकारी, पद मिळाल्यानंतर मात्र खुर्चीभोवतीच घुटमळत आहेत. दुष्काळाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करण्यापेक्षा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि कामांतच त्यांना जास्त इंटरेस्ट असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी सोशल मीडियावर सत्ताधारी भाजपविरोधात टाहो फोडत असताना, पंचायत समितीत निष्क्रिय पदाधिकाऱ्यांविरूध्द मात्र शब्द काढत नाहीत.
सभापतींनी केवळ पाच गावांची पाहणी करून केवळ औपचारिकता पूर्ण केली. या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा होताना दिसून येत नाही.