सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर, हनुमान जयंती, तसेच राम नवमीनिमित्त जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. जयंती व उत्सव साजरा करण्यासाठी सक्तीने वर्गणी वसूल केल्याचे निदर्शनास आल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी यांनी केली. जयंतीनिमित्त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘करडी’ नजर ठेवली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे, असेही फुलारी यांनी सांगितले.ते म्हणाले, आंबेडकर, महावीर व हनुमान जयंती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मिरवणुका, रॅली व जाहीर सभा घेतल्या जातात. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. विनापरवाना जाहिरातींचे फलक लावल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. झेंडे लावण्यावरून दंगल घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कुठेही झेंडे लागणार नाहीत, या दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. जे परवानगीने पोस्टर, झेंडे लावतील, त्यांनी जयंती झाल्यानंतर ते स्वत:हून काढून घ्यावेत. जयंती साजरी करणाऱ्या मंडळांनी ध्वनिक्षेपकाचा परवाना घ्यावा, ध्वनिप्रदूषण करू नये. मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नये. आंबेडकर जयंतीनिमित्त ध्वनिक्षेपक लावण्यास रात्री १२ पर्यंत परवानगी दिली आहे. ते म्हणाले, मिरवणुकीत कोणत्या घोषणा देणार आहात, याची माहिती संबंधित पोलिस ठाण्यांना कळविणे बंधनकारक केले आहे. रस्त्यावरील नागरिक व वाहनांना अडथळा होईल, अशी मिरवणूक नेऊ नये. मिरवणूक मार्गात कोणताही बदल करू नये. पुतळा व मूर्तीच्या सुरक्षेची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. मिरवणुकीतील वाहनाचा चालक मद्य प्राशन केलेला नसावा, याची दक्षता घ्यावी. बाहेरील जिल्ह्यातील एक पोलिस उपअधीक्षक, सहायक निरीक्षक पाच, राज्य राखीव दलाची एक तुकडी, गृहरक्षक दलाचे चारशे जवान असा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)कायदा कोणीही हातात घेऊ नयेफुलारी म्हणाले, आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) व उमदी (ता. जत) येथील यात्रांना सुरुवात होणार आहे. या दोन्ही यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक येतात. याठिकाणच्या बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. विट्यातील मारामारीप्रकरणी कारवाई सुरू आहे. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये.
सक्तीने वर्गणी वसुली केल्यास गुन्हा
By admin | Published: April 11, 2016 11:05 PM