विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यात वारणा व मोरणा नदीवरील महापुराची परिस्थिती कायम आहे. पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने देववाडीचा संपर्क तुटला आहे. फकिरवाडी येथील पाझर तलाव फुटला तर अनेक रस्त्यांवरील पूल खचले. काही ठिकाणी भराव वाहून गेले. शेतातील पिके, बांध यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खराडे येथे गावाशेजारी जमिनीचे भुस्खलन झाले आहे.
तोरणा ओढ्यास इतिहासात पहिल्यांदा आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले. पूल गल्ली येथील रस्ता वाहून गेला. गोपाल कृष्ण पथाकडे जाणारा रस्ता बंद झाला. मुलाणी गल्लीच्या बाजूचा रस्ता वाहून गेला. येथे असणारे तारेचे कुंपणही वाहून गेले. पुरात मोठमोठी झाडे वाहून आली आहेत. शिराळा-मांगले मुख्य रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिराजवळील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग तसेच रस्त्याचा भराव वाहून गेला. कापरी येथील सुजयनगरला जाणारा पूल तुटला.
वाकुर्डे बुद्रूकहून झोळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्यावरील पूल तुटून पाइप वाहून गेल्या. दोन दिवसांपासून येथील नागरिकांचा वाकुर्डे बुद्रूकशी संपर्क तुटला आहे. शेतकरी बांधवांना डेअरीपर्यंत दूध पोहोचवता न आल्याने नुकसान झाले. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे.
पाचगणी ते बुरबुशी रस्ता तुटून वाहतूक बंद झाली. वाकुर्डे बुद्रूक ते येळापूर रस्त्यावरील व्हरडोबा खिंडीत दरड कोसळली. वाकुर्डे बु. परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या, रस्ते खचले आहेत. वाकुर्डेवरून झोळे वस्तीकडे जाणारा रस्ता खचला आहे. वाकुर्डेवरून पदळवाडीला जाणारा रस्ता खचला आहे. वाकेश्वर मंदिर व चौकाला सलग दोन दिवस ४-५ फूट पाण्याचा वेढा होता.
वाकुर्डे ते येळापूरदरम्यानच्या घाटामध्ये व्हरडोबाची खिंड आहे. अतिवृष्टीमुळे डाव्या बाजूचा डोंगर भुस्खलन होऊन घसरला आहे. परिणामी रस्ता पूर्ण बंद झाला आहे.
अनेक गावांतील विजेचे खांब पडले आहेत. ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडले आहेत. शिराळा येथेही हीच परिस्थिती असल्याने गेले तीन दिवस पिण्याचे पाणी आले नाही. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मुसळधार पावसातही दुरुस्तीचे काम करत आहेत. बससेवा बंद आहे.
वारणेचे पाणी अजूनही पात्राबाहेर आहे. त्यामुळे मोहरे, चरण, आरळा, सोनवडे, सांगाव, पुनवत, मांगले, देववाडी, कांदे, कोकरूड, बिळाशी, चिंचोली, प. त. वारुण या गावातील १८४२ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. २२२८ जनावरे बाहेर काढली आहेत. फकिरवाडी येथील पाझर तलाव फुटला आहे.