सुरेंद्र दुपटे
संजयनगर/सांगली : मागील काही दिवसापासून कडक उन्हाचा तडाखा असून सांगलीतील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळा सुरू झाला असून दुसऱ्या आठवड्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या आहेत. कडक उन्हामुळे सांगलीकर हैराण झाले आहेत. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान सांगलीतील सर्व रस्ते ओस पडत आहेत.
सांगलीमध्ये वाहनांची वाहतूक मंदावली असून एखाद-दुसरे वाहन रस्त्यावर दिसत आहे. मागील काही वर्षांमध्ये सांगलीतील वातावरण कमालीचा बदल झाला. आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सकाळपासून गरमीचे वातावरण होत आहे, तर दुपारी अकरा-बारा वाजल्यानंतर कडक उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
सायंकाळच्या प्रवासाला पसंती
कडक उन्हाच्या फटका सांगलीतील वाहन चालकावर झाला असून दुपारच्या उन्हापासून वाचण्यासाठी अनेक वाहनचालक दुपारी आपली वाहने सावलीच्या ठिकाणी एखाद्या हॉटेलजवळ लावून बसलेले दिसत आहेत. नागरिक दुपारी घराबाहेर निर्णय टाळत असून वाहतूक मंदावली आहे. बाजारपेठ, रस्ते ओस पडत आहेत. परिणामी व्यवसायावर, दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.