घाटनांद्रे : मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे. संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी आहे. आजच्या युगात लोकांमधील हीच माणुसकी आटत चालल्याचे म्हटले जात असले तरी काही घटनांमुळे समाजात आजदेखील माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येते. याचाच प्रत्यय डोंगरसोनी (ता. तासगाव) येथे आला.
तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील रहिवातप ज्ञानदेव कांबळे (वय ६४) हे आपल्या दुचाकीवरून सावळजहून आपले काम उरकून तिसंगीकडे येते होेते. वाटेत डोंगरसोनी हायस्कूलजवळ असलेल्या धोकादायक स्पीड ब्रेकरजवळ त्यांची गाडी घसरली; यात ते रस्त्यावर जोरात आदळले. अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला मोठी दुखापत झाली. अपघात घडताच डोंगरसोनी हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कांबळे यांची विचारपूस करून आधार दिला. त्याचवेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले डोंगरसोनी येतील वाॅर्ड क्रमांक ४ मधील उमेदवार अमित झांबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या निवडणुकीचा प्रचार टाळून ज्ञानू कांबळे यांना आपल्या गाडीत बसवून सावळज येथील रुग्णालयात दाखल केले. तसेच कांबळे यांच्याबाबत घडलेल्या अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देऊन त्यांना मदतीला बोलावून घेतले. वेळीच उपचार झाल्याने ज्ञानू कांबळे यांच्या जिवावर ओढवलेले संकट टळले.
अमित झांबरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे एक जीव वाचला. निश्चितपणाने अशा संवेदनशील मनाच्या लोकांमुळे समाजातील माणुसकीचा झरा जिवंत असल्याचे दिसून आले.