मुस्लीम जमियत ईदगाह समितीने ईदची नमाज ईदगाह मैदानावर होणार नसल्याचे जाहीर केले होते. शहर पोलिसांनी मैदानावर बंदोबस्त ठेवला होता. शासकीय नियमानुसार फक्त तिघांनाच मैदानावर नमाजपठणाची परवानगी देण्यात आली. उर्वरित मुस्लीम धर्मीयांनी घरातच नमाजपठण केले. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शहरातील विविध मस्जिदींमध्येही ईदच्या नमाजासाठी गर्दी होणार नाही, याकडे पोलिसांनी लक्ष ठेवले होते. सकाळच्या नमाजानंतर कब्रस्थानमध्येही प्रार्थनेसाठी भाविक जातात. परंतु, आज तेथेही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. दरवाजे कुलूपबंद ठेवले होते. पोलिसांनी सकाळी शहरभर फिरून घरातच नमाजपठणाचे आवाहन केले. बंदोबस्तही कडक केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले स्वत: बंदोबस्ताची पाहणी करत होत्या. मुस्लीम भाविकांनी फोनवरूनच परस्परांना शुभेच्छा दिल्या. संचारबंदीत अत्यावश्यक कारणाशिवाय शहरात फिरण्यावरही निर्बंध होते, त्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळींना शिरखुर्म्याचे वाटपही झाले नाही.