अंकलखोप/भिलवडी : डॉ. पतंगराव कदम जनतेच्या मनातील राजे होते. पूरग्रस्त पलूस तालुका आणि दुष्काळी कडेगाव तालुका असा पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. पण पतंगराव कदम यांनी सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून या मतदारसंघांचा चेहरामोहरा बदलून देशभर नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांनी तयार केलेल्या पायावर कळस रचायचे काम तुमचा मुलगा आणि भावाच्या नात्याने करण्यासाठी मी बांधील आहे, असे प्रतिपादन आमदार विश्वजित कदम यांनी केले.
दसऱ्याच्या मुहूर्तावर औदुंबर (ता. पलूस) येथे काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचाराचा प्रारंभ महिला कार्यकर्त्यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मोहनराव कदम, तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील, श्रीमती विजयमाला कदम, स्वप्नाली कदम, महेंद्र लाड आदी उपस्थित होते.विश्वजित कदम म्हणाले, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण काँग्रेसने दिले. भारती विद्यापीठातून बहुजनांची मुले शिकवली. राज्यातील ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक शिक्षित महिला असणारा हा मतदारसंघ आहे. येथील शेतीमध्ये नावीन्यपूर्ण पिकांची निर्मिती झाली पाहिजे, औद्योगिक क्रांती झाली पाहिजे. सरकार कोणाचे का असेना, आपल्या मनगटात ताकद आहे.
आमदार पाटील म्हणाल्या की, आर. आर. पाटील व डॉ. पतंगराव कदम यांची कार्यकर्त्यांना उणीव भासू देणार नाही. त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विश्वजित कदम यांना निवडून द्यावे.बाळकृष्ण यादव, पलूस तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारुती चव्हाण, काँग्रेसचे पलूस तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, डॉ. मीनाक्षी सावंत, मालन मोहिते, वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुस्मिता जाधव, शकुंतला मोरे, आवडाबाई सदामते, क्षीतिजा पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.
श्वेता बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. लता ऐवळे-कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रणाली पाटील यांनी आभार मानले. यावेळी जयसिंगराव कदम, प्रकाश पवार, आनंदराव मोहिते, जे. के.(बापू) जाधव, घन:श्याम सूर्यवंशी, उदय पाटील, अनिल विभुते, मनीषा रोटे उपस्थित होते.
नारीशक्तीचा सन्मानऔदुंबरच्या डोहात राजकीय मतभेद बुडवून पुरुष नेतेमंडळींनी प्रचाराचे नारळ फोडण्याची परंपरा यावेळी मोडीत काढण्यात आली. प्रथमच सर्वसामान्य महिलांना प्रचाराचा नारळ फोडायला लावून, नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.
प्रचाराची यंत्रणा महिलांच्या हातीआपली लढाई विकासाच्या मुद्यावर राहील. मला राज्यभर फिरायचे आहे, तेव्हा प्रचाराची सगळी यंत्रणा महिलांच्या हाती सोपवित असल्याचे विश्वजित कदम यांनी जाहीर केले.