इस्लामपूर : कोल्हापूर ते मुंबई असा खासगी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेचे २ लाख रुपये किमतीचे दागिने पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले.
पेठ नाका येथील एका हॉटेलमध्ये महिला स्वतःहून चार तोळे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपयांची रोकड असणारी पर्स विसरून गेल्या होत्या. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. हॉटेल मालकाने हे दागिने व रोकड पोलिसांच्या मदतीने महिलेच्या नातेवाइकांकडे सुपूर्द केली.
शुभदा महेश घागरे असे या महिलेचे नाव आहे. त्या खासगी बसने कोल्हापूरहून मुंबईला निघाल्या होत्या. पेठ नाका येथे त्यांनी मणिकंडन हॉटेलमध्ये नाष्टा व चहापान केले. जाताना त्या आपली पर्स विसरून गेल्या. बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांना आपली पर्स सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ महामार्ग गस्तीवर असणाऱ्या पोलीस पथकातील अजित औटे यांना ही माहिती दिली.
गस्तीवर असणाऱ्या पथकाने हॉटेलमध्ये धाव घेत पर्सबाबत विचारणा करत ती चालक विघ्नेश यांच्याकडून ताब्यात घेतली. पर्समधील दागिने आणि रोख रकमेबाबत घागरे यांनी केलेले वर्णन पडताळून पोलिसांनी ही पर्स त्यांची असल्याची खात्री केली. त्यानंतर घागरे यांच्या सूचनेवरून त्यांचे नातेवाईक विकास देसाई यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेंडगे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
देसाई यांनी गस्त पथकातील सहायक फौजदार सुनील कुलकर्णी, पोलीस नाईक सुनील वडार, सूर्यकांत निकम, प्रवीण धोत्रे, चंद्रकांत वंजारी, रमेश पाटील, अजित औटे यांचे आभार मानले.
फोटो-