सदानंद औंधे ।मिरजेतील फुटबॉल खेळाला शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. मिरज व फुटबॉलचे अतूट नाते आहे. मिरजेतील फुटबॉलपटूंच्या दर्जेदार खेळाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर दबदबा होता. मात्र गेल्या दोन दशकात फुटबॉल संघटनांच्या राजकारणामुळे मिरजेतील फुटबॉल लयाला जात असल्याची खंत ज्येष्ठ राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू डॉ. अशोक सातपुते यांनी व्यक्त केली. सत्तरीत असलेले डॉ. सातपुते गेल्या ५५ वर्षांपासून फुटबॉल खेळतात. आजही त्यांचा उत्साह तेवढाच आहे.
प्रश्न : मिरजेतील फुटबॉलला किती वर्षाची परंपरा आहे?स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात मिरजेत अनेक फुटबॉल खेळाडू व संघ तयार झाले. परदेशी मिशनरी डॉक्टरांच्या आगमनानंतर मिरजेत फुटबॉलचा परिचय झाला. डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी १८९४ मध्ये मिशन रुग्णालय उभारले. येथील कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी फुटबॉलचा खेळ सुरू झाला. १९३० च्या सुमारास ‘मिरज कंबाईन क्लब’ या संघाची स्थापना झाली. स्वातंत्र्योत्तर काळात लकी स्टार व रेल्वे यंग बॉईज या संघांनी राज्यातील अनेक स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजविले. त्या काळात जिल्ह्यात मिरजेत सर्वाधिक प्रेक्षक, खेळाडू व संघ होते.
प्रश्न : जिल्ह्यात मिरजेतच फुटबॉल लोकप्रिय होण्याचे कारण?मिरजेत ख्रिश्चन व रेल्वे कर्मचारी दक्षिणात्य ख्रिश्चन मंडळींचे वास्तव्य आहे. माणिकनगर रेल्वे वसाहतीतील खेळाडूंनी रेल्वे यंग बॉईज हा संघ स्थापन केला. लकी स्टार विरुध्द रेल्वे यंग बॉईज या मिरजेतील दोन प्रमुख संघातील संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत असे. अनेक खेळाडूंना पोलीस दल व रेल्वेत नोकरी मिळाली. वर्षभर देशभरातून संघ सहभागी होत असल्याने मिरजेतील फुटबॉलची लोकप्रियता कायम राहिली. न्यू स्टार, लकी स्टार, रेल्वे ब्ल्यू स्टार, डायमंड, बीबीसी, मिरज सिटी, जेकेएफ, एसएस प्रॅक्टीस बॉईज, प्रॅक्टीस, मंगळवार पेठ, केएफसी, मिरज युनायटेड यासह अनेक संघ मिरजेत असल्याने खेळाडू व प्रेक्षकांचे फुटबॉलवरील प्रेम कायम होते.आजची स्थिती!१९७० ते १९९५ पर्यंत मिरजेतील फुटबॉलचा राज्यात दबदबा होता; मात्र त्यानंतर फुटबॉल संघटनांच्या राजकारणामुळे मिरजेतील फुटबॉल खेळाला उतरती कळा लागली आहे. कोल्हापूरच्या तुलनेत मिरजेतील फुटबॉल २५ वर्षे पिछाडीवर गेला आहे. एकेकाळी हार-जीत झाल्यानंतर सर्व खेळाडू मैदानाबाहेर एकत्र असायचे; मात्र गेल्या दोन दशकात मैदानात हाणामाऱ्या, पंचांना मारहाण यामुळे मिरजेतील फुटबॉलला ग्रहण लागले आहे.काय हवे?संघटनांमध्ये फुटबॉलचे ज्ञान असलेले पदाधिकारी पाहिजेत. १२ ते १४ वयोगटातील मुले व महाविद्यालयात शास्त्रशुध्द प्रशिक्षणाची गरज आहे. खेळाडूंना शिस्तीचे धडे दिले पाहिजेत. सुमार व पक्षपाती पंचगिरी फुटबॉलच्या लयाला कारणीभूत आहे. स्पर्धांचे वर्षभर आयोजन हवे. मिरजेतील संघात अन्य राज्यातील खेळाडू खेळविणे, असे प्रकार बंद करावे लागतील.
विविध संघटनांमधील वादाचा फटकामिरजेत महापालिकेच्या शिवाजी क्रीडांगण या एकमेव मैदानाचा पावसाळ्यात तलाव होतो. कुंपणाची पडझड झाली आहे. - अशोक सातपुते