अशोक डोंबाळे सांगली : अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदा जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात घटली आहे. दरवर्षी सात ते आठ हजार टन निर्यात होते, मात्र यंदा ४0 टक्के बागा खराब झाल्या आहेत. दि. २ डिसेंबरपर्यंत केवळ १४५१ शेतकऱ्यांनी ८१०.४१ हेक्टरवरील द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी केली असून, पहिला चौदा टनाचा कंटेनर मागील आठवड्यात सौदी अरेबियाला रवाना झाला आहे.टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ योजनांमुळे द्राक्षाचे क्षेत्र वाढू लागले आहे. जिल्ह्यात सव्वा लाख एकरापर्यंत द्राक्षाचे क्षेत्र झाले आहे. यापैकी १० टक्केच द्राक्षाची निर्यात होत आहे, असे द्राक्ष बागायतदार संघाचे सुभाष आर्वे यांनी सांगितले.रेसिड्यू फ्रीची कडक कसोटी पार करून ही निर्यात होत आहे. २०१६ मध्ये ६७३७ टन, २०१७ मध्ये ८८८७ टन, २०१८ मध्ये ८१४५, २०१९ मध्ये ७४२२.५० टन द्राक्षे नेदरलँड-नॉर्वे, अमेरिका, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन, बेल्जियम, फ्रान्स, चीन आदी १९ राष्ट्रांमध्ये निर्यात झाली आहेत.
दुबई, चीन, रशिया, मलेशिया, सिंगापूरला द्राक्षांची मोठी निर्यात होते. डिसेंबर, जानेवारीमध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षांना सरासरी ८० ते १०० रुपये किलोपर्यंत दर मिळतो. त्यामुळे शेतकरी सप्टेंबरमध्ये द्राक्षांची छाटणी घेतात. यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर असे तीन महिने नदीकाठच्या भागासह दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला.
सलग तीन महिने पाऊस आणि ढगाळ हवामान राहिले. द्राक्षबागेत सतत पाणी राहिल्यामुळे दावण्यासह अनेक रोगांचा फैलाव झाला. वेलींना मुळ्या सुटल्या, द्राक्षमण्यांची गळ झाली. खानापूर, तासगाव, जत, मिरज तालुक्यातील ४0 टक्के द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.
उर्वरित भागातील उत्पादन घटणार आहे. या सर्वाचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. निर्यातक्षम द्राक्षांमुळे शंभर कोटींचे परकीय चलन जिल्ह्याला दरवर्षी मिळत आहे. यावर्षी १४५१ शेतकऱ्यांचे ८१०.४१ हेक्टर क्षेत्र निर्यातीसाठी नोंदणी झाले आहे, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.