सांगली : एफआरपी दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात केलेल्या आंदोलनानंतर खा. राजू शेट्टी यांना अटक केलेल्या कारवाईचे पडसाद शहरात व नांद्रे येथे उमटल्याने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी जिल्ह्यातील पोेलीस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. २७ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.जिल्ह्यात प्रत्येकवर्षी शेतकऱ्यांच्या ऊस प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन केले जाते. यंदाही गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू झाले आहे. रास्ता रोको, साखर कारखान्यांचे शेती कार्यालये पेटवून दिली जात आहेत. आज, सोमवार इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाट्यावर रास्ता रोको व नांद्रे (ता. मिरज) येथे एसटी बसवर दगडफेक झाल्याने आंदोलन वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. यातून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. इस्लामपूर, आष्टा, पलूस, नांद्रे, वसगडे, कर्नाळ, लक्ष्मी फाटा याठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली असल्याने सावंत यांनी येथे पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.स्थानिक पोलिसांशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी दाखल झाली आहे. जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तो २७ जानेवारीपर्यंत असणार आहे. सोमवारी सायंकाळपासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागात नाकाबंदी लावण्यात आली होती. संशयित वाहनांना थांबवून चौकशी केली जात होती. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात नांद्रे, वसगडे या गावाकडे जाणारी सर्व वाहने थांबवून पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. तत्पूर्वी पोलिसांमार्फत दंगलविरोधी प्रात्यक्षिक करण्यात आले. यामध्ये लाठीमार, दगडफेक, जाळपोळ याविरोधातील प्रात्यक्षिक करण्यात आली. प्रात्यक्षिकामुळे दंगल झाल्याच्या अफवा शहरात तसेच ग्रामीण भागात पसरल्या होत्या. (प्रतिनिधी)सुटट्या, रजा बंदजिल्ह्यातील पोलिसांच्या साप्ताहिक सुटट्या व रजा बंद करण्यात आल्या आहेत. रजा व सुट्टीवर गेलेल्या पोलिसांना सोमवारी सायंकाळी पुन्हा ड्युटीवर बोलावून घेण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयात आठ राखीव पोलीस दलाच्या तुकड्या वाहनासह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
ऊसदराच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील बंदोबस्तात वाढ
By admin | Published: January 12, 2015 11:16 PM