सांगली : रायगड जिल्ह्यातून हरणांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारास पकडण्यात वनविभागास यश आले आहे. संजय गोविंद संकपाळ (वय ४०, रा. मुंबोशी, जि. रायगड) असे त्याचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी ही दोन्ही हरणांची पाडसे शेतात आली होती. तेव्हापासून त्यांचा सांभाळ करून पाळली असल्याची कबुली संकपाळने दिली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या संकपाळ व त्याचे दोन साथीदार फिरोज कुडपकर, संजय धुमाळ या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पेठ-इस्लामपूर तालुका वाळवा येथे कुडपरकर व धुमाळ यांना पकडले होते. ही पाडसे इस्लामपूर येथील एका व्यक्तीच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी आणल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबोशी येथील बुवा नामक व्यक्तीने त्यांची हरणांची पाडसे विकत घेतल्याची माहिती पुढे आली होती. हा बुवा म्हणजे संकपाळ आहे. ही दोन्ही पाडसे पंधरा दिवसांची असताना ती संकपाळच्या शेतात आली होती. यामुळे संकपाळने त्यांना पकडले होते. तेव्हापासून तो त्यांचा सांभाळ करीत होता. कुडपकर मिरजेत एका खासगी रुग्णालयात येत असे. त्यावेळी त्याच्या इस्लामपुरातील एका व्यक्तीशी ओळख झाली. यातून कुडपकरने संकपाळकडे असलेल्या हरणांचा विषय काढला. या हरणांना तो कापून खाण्यासाठी विक्री करणार असल्याचेही त्याने सांगितले. यामुळे इस्लामपूरच्या त्या व्यक्तीने दोन्ही हरणे मी विकत घेतो, असे सांगितले. त्यानंतर कुडपकरने दोन्ही पाडसे संकपाळकडून दहा हजाराला विकत घेतली. इस्लामपूरच्या व्यक्तीशी तीस हजाराला सौदा केला होता. तत्पूर्वी त्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणला याची माहिती मिळाल्याने कुडपकर सापडला. संकपाळसह कुडपकर पोलिसांना सापडावा, हरणांची जीन जाऊ नये, यासाठी इस्लामपूरच्या ‘त्या’ व्यक्तीनेच पोलिसांना ‘टीप’ दिल्याचा संशय आहे. (प्रतिनिधी)
शेतात आल्याने हरणांची पाडसे पाळली!
By admin | Published: June 19, 2015 12:08 AM